Home बातम्या ऐतिहासिक बोगस बियाणे वितरण करणाऱ्या केंद्रावर कारवाई करा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद

बोगस बियाणे वितरण करणाऱ्या केंद्रावर कारवाई करा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद

0
बोगस बियाणे वितरण करणाऱ्या केंद्रावर कारवाई करा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद

नागपूर,दि. 23 : शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे व खतांचा पुरवठा मुबलक करावा.  कुठीही तक्रार येता कामा नये. तसेच बोगस बियांणाचा पुरवठा करणाऱ्या कृषी केंद्रावर धाड टाकून  कारवाई करावी, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

खरीप पूर्व आढावा बैठकीचे आयोजन  जिल्हा परिषदेच्या स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात  करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी  बर्वे,   मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बाल कल्याण सभापती  उज्ज्वला बोंढारे, अतिरिक्त कार्यकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे,  जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती  आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने तयार करुन पंजाबराव कृषी विद्यापीठास पाठवावी, त्यास महिनाभरात कार्यवाही करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार असल्याचे  केदार यांनी सांगितले

कापूस, सोयाबिन पिकांचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे, त्यासोबत मका व ज्वारी या पिकांच्या क्षेत्र वाढीवर  शेतकऱ्यांनी जास्त भर दयावा. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करुन ग्रामीण भागात पत्रके वाटून जनजागृती करावी. वस्तुस्थितीवर आधारित पिकांची माहिती देवून पिकांचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांना समजावून सांगा. बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रावर भरारी पथकांच्या सहाय्याने धाडी टाकून कारवाई करा. खत व किटकनाशकांची कमतरता पडणार नाही यांची दक्षता घ्या. निधीचीकमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जमीनीची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत असून तिचे आरोग्य धोक्यातआहे, याची जाणीव ठेवून सेंद्रीय खतांचा वापर करा. याबाबत शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला यावेळी दिल्या. कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक व संपर्क दुरध्वनीची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी आठ दिवस कृषी विभागाचा योजनांची प्रसार व प्रचार करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत जनजागृती शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात  फळबाग उत्पादन वाढीसाठी संत्रा,मोसंबीसह  व्हिएन आर पेरुची लागवडीस   प्राधान्य दयावे. जेणे करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. यासोबत वातावरणसंगत उत्पादनांना प्राधान्य दया,असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी खरीप पुर्व हंगामाबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यात खरीप हंगामात चार मुख्यपिक घेण्यात येत असून 4 लाख हेक्टर 77 हजार क्षेत्र कापूस तर 1 लाख 57 हेक्टर क्षेत्रात  सोयाबिन उत्पन्न घेण्यात येते तर तांदुळ 88हजार 905 हेक्टर क्षेत्र व तुर 83 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. यासोबत मका व ज्वारीचे उत्पन्न घेण्यात येते. विभागाकडे मुबलक खतांचा पुरवठा आहे, असेही त्यांनी सांगितले.

 00000