Home ताज्या बातम्या बोपदेव घाटमाथ्यावर बसचे इंजिन फुटले?

बोपदेव घाटमाथ्यावर बसचे इंजिन फुटले?

0

पुणे : सासवड येथून कात्रजकडे दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी पीएमपीची बस निघाली. साधारण 12-13 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर, साधारण दुपारी सव्वाचारच्या सुमारास बोपदेव घाटमाथ्यावर इंजिनचा आवाज येऊन ऑईल रस्त्यावर सांडले. यामुळे बसचे इंजिन फुटल्याची चर्चा सुरू झाली, यात प्रवासी भयभीत झाले होते. या घटनेनंतर तब्बल 20 मिनिटांना प्रवाशांना दुसऱ्या बसची वाट पाहावी लागली. तर पीएमपीचे कर्मचारी आणि सर्व्हीस व्हॅन सायंकाळी घटनास्थळी पोहोचले. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची संतप्त भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

कात्रज – सासवड – कात्रज मार्गावर रोज ये-जा करणारे शेकडो नागरिक आहेत. मात्र, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे. या मार्गावर अनेकदा ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड आणि अपघाताच्या घटना घडत असल्याने प्रवाशांकडून प्रशासनाकडे बसेसची वारंवारता वाढवण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

कात्रज – सासवड – कात्रज या मार्गावर अनेकदा बसबाबत अपघातसदृश्‍य घटना घडतात. या गाडीमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असते. वारंवार तक्रार करून देखील पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. बस घाटात असताना काही दुर्घटना घडल्यास, प्रवाशांची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल प्रवासी दत्तात्रय फडतरे यांनी केला आहे. गाडी वेगात असल्याने गिअर’ बदलताना अशा घटना घडू शकतात. सासवड ते कात्रज मार्गावर चढ असण्याने इंजिन आणि गिअर बॉक्‍स तुटण्याची शक्‍यता असते. याही घटनेमध्ये इंजिन आणि गिअर बॉक्‍सचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कात्रज डेपोचे विकास जाधव यांनी दिली.

रस्ता रुंदीकरणाची मागणी…


कात्रज ते सासवड मार्गावर गाडी धावणे अवघड आहे. या घाटात अवघड चढ असून, रस्ते देखील अरूंद आहेत. त्यामुळे इंजिनवर ताण येऊन गाड्यांची झीज होत आहे. मात्र, प्रवाशांच्या हट्टापायी या मार्गावर बसेस सोडण्यात येतात. या मार्गाचे रूंदीकरण होण्याची गरज आहे, असे कात्रज डेपोचे विकास जाधव यांनी सांगितले.