ब्रिटनचे राजकुमार विल्यम यांची ‘चाणक्य स्कूल ऑफ क्राफ्ट्स’ला भेट – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. १८: ब्रिटनचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन यांनी मुंबईतील लोअर परेल येथील ‘चाणक्य स्कूल ऑफ क्राफ्ट्स’ला आज सकाळी भेट दिली.

    यावेळी ‘चाणक्य स्कूल ऑफ क्राफ्ट्स’ संस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले तसेच भारतीय पारंपरिक हस्तकला, वस्त्रनिर्मिती, कलाकुसर तसेच कारागिरांच्या कौशल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

    भेटीदरम्यान संस्थेच्या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या कलावस्तूंचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन यांनी निरीक्षण केले. पारंपरिक विणकाम आणि क्रोशे या हस्तकला प्रकारांची वैशिष्ट्ये, त्यातील कलात्मकता आणि कौशल्य याबाबत त्यांना माहिती देण्यात आली.

    या भेटीदरम्यान राजकुमार विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन यांनी संस्थेशी संबंधित प्रतिनिधी, शाश्वत वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचे लाभार्थी तसेच स्थानिक कारागिरांशी संवाद साधला. पारंपरिक कौशल्यांचे महत्त्व, कारागिरांचे योगदान, हस्तकलेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या उपलब्ध संधी याबाबत त्यांना माहिती दिली.

    ०००

    संजय ओरके/विसंअ

    - Advertisement -