Home ताज्या बातम्या भक्तांनी वाढवली अख्या शहराची चिंता ,जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचा कोरोनानं मृत्यू

भक्तांनी वाढवली अख्या शहराची चिंता ,जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचा कोरोनानं मृत्यू

रतलाम – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने दिलेले आव्हान रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र मध्य प्रदेशातील रतलाम येथे एक धक्कादायक प्रकार घडला. रतलाम येथील एका जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचा कोरोनानं मृत्यू झाला.

दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल २९हून अधिक भक्तांना कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. या भोंदूबाबाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या भक्तांची कोरोना चाचणी केली तेव्हा हे प्रकरण समोर आलं.

या बाबाचा ४ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रशासनाने बाबांच्या संपर्कांत आलेल्यांचा शोध घेत लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता शहरात कोरोनाचा स्फोट झाला. या बाबाच्या मृत्यू होण्यापूर्वी २९ लोकांना कोरोनाची लागण झाली होती.

रतलामचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर ननावरे यांनी सांगितलं की, नायपुरा येथील एका बाबाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला. त्या बाबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. काही भक्तांचा शोध सुरु असून यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे.