
मुंबई, दि. ९ :- “अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद असून मानवकल्याणाचे हे विचार आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धापूर्वक वंदन केले आहे. महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत ही त्यांची ओळख होती. त्यांनी मानवतावादाचे विचार मांडले. अखिल प्राणीमात्रांनी सुखी रहावे हे त्यांचे ध्येय होते. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांनी ऐहिक सुखाचा त्याग केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील, सदाचारासारख्या सद्गगुणांचं महत्वं जगाला समजावून सांगितलं. अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा, बंधुत्वाची शिकवण दिली. ही शिकवण आजच्या काळात तितकीच किंबहूना अधिक महत्वाची आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.
—–००००—–