
मुंबई, दि. २१ : भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात यावीत. सर्वेक्षण करून, त्यांना महत्वाच्या दाखल्यांचे वितरण करुन शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या माध्यमातून एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.
मंत्रालय येथील दालनात आढावा बैठक झाली.
सर्वेक्षण १५ जुलै पर्यंत पूर्ण करावे
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण करुन त्यांना शासनाच्या आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आभा कार्ड अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी या समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश महसूल विभागामार्फत देण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राजस्व मंडळनिहाय शिबिर आयोजित करून भटक्या विमुक्त समाजाचे सर्वेक्षण १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावे. याचबरोबर त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यामधून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यास गृह चौकशी करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भटक्या-विमुक्त जाती विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. दृकश्राव्य माध्यमातून राज्यातील जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांनी केलेल्या सर्वेक्षण आणि दाखले वितरणाबाबतची माहिती यावेळी दिली.
00000