सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर वडवळ गावानजीक आज सकाळी डांबर वाहतूक करणारा ट्रक हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून थेट रेल्वेमार्गावर कोसळला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील पुलाचे लोखंडी कठडे तोडत खाली असलेल्या सोलापूर-पुणे मध्य रेल्वेच्या रेल्वेरुळावर ट्रक आदळल्याने सोलापूर-पुणे रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे.
अपघातग्रस्त ट्रक (केए 56 – 3649) पुण्याहून सोलापूरकडे डांबर घेऊन जाताना वडवळ गावानजीक असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ शहराच्या पुढे पुलाचे लोखंडी कठडे तोडून खाली असलेल्या सोलापूर-पुणे मध्य रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून वेळीच उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला आहे. मात्र, यात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून हा ट्रक रेल्वेच्या रुळावर आल्याने सोलापूर-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ दाखल झाले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रकमधील डांबराचे बॅरल उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले असून क्रेनच्या साहाय्याने लवकरच हा ट्रक रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात येणार आहे. यानंतरच सोलापूर-पुणे रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ शकेल.