Home शहरे अमरावती भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला लाच घेताना अटक

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला लाच घेताना अटक

0

अमरावती : शिक्षण संस्थेचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना अमरावती येथील भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने हा सापळा यशस्वी केला. शरद शेषराव मोहोड (रा. काटपूर ममदापूर, ता. मोशी) असे लाचखोर जिल्हा परिषद सदस्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, नेरपिंगळाई गणाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांनी संबंधित संस्थेच्या सचिवाला ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

जय महाकाली शिक्षण संस्थेचे सेमाडोह येथे मुलींचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृह व संस्थेचे अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्याकरिता मोहोड यांनी संस्थेचे सचिवाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. आरोपी शरद मोहोड हे समाजकल्याण समितीचे सदस्य असल्याने व अनुदानाचा मुद्दा समितीच्या अखत्यारीत असल्याने ही लाच मागण्यात आली.