Home ताज्या बातम्या भाजपला इशारा दिल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भाजपला इशारा दिल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0
भाजपला इशारा दिल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  • राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता
  • संजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांना भेटलो!

मुंबई: आरक्षणावरून राज्यात सुरू असलेलं राजकारण, आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी टाकण्यात आलेले ईडीचे छापे, या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती व त्यात काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. महाआघाडीतील पक्षांमध्ये काही मुद्द्यांवरून खटके उडत असले तरी सरकार स्थिर आहे. स्वबळाची भाषा केली जात असली तरी आरक्षणासारख्या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांचे नेते सरकारची बाजू ठामपणे मांडत आहेत. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांकडून सरकारमधील मंत्री व नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा अद्याप थांबलेला नाही. प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं आघाडीच्या नेत्यांना होत असलेल्या त्रासाला एक प्रकारे वाचा फुटली आहे. दुसरीकडं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी दुसऱ्यांदा छापे टाकण्यात आले असून चौकशीसाठी त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

वाचा: …तर राजकारण सोडेन; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

या घडामोडींवर खासदार राऊत यांनी आजच प्रतिक्रिया दिली होती. ‘हे सगळं नैराश्यातून सुरू आहे. पण आम्हीही बघून घेऊ’ असा इशारा त्यांनी भाजपला दिला होता. त्यानंतर काही तासांतच राऊत ‘मातोश्री’वर पोहोचले आहेत. अलीकडंच राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर राऊत मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. त्यामुळं या भेटीत केंद्रीय यंत्रणांच्या त्रासाला सामोरे जाण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा: ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांनी सांगितली दोन नावं

मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आधी राऊत यांना माध्यमांनी विचारण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहात? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला जात आहोत, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळं दोघांमध्ये पक्ष संघटनेशी संबंधित चर्चा झाली असावी, असाही एक अंदाज बांधला जात आहे.

वाचा: नुसती आदळआपट करणं याला नेतृत्व म्हणत नाहीत; मुख्यमंत्र्यांचा टोला

Source link