मुंबई, दि. 27 :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या इतिहासातील या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचा उद्देश राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणे आणि नागरिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी व जगभरातील लोकशाही-प्रेमी नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण असून लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याचा हा प्रसंग आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना आपण स्वत:प्रत अर्पण केली. या घटनेला दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दि.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात येऊन २६ जानेवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या ७५ वर्षांचा प्रवास उल्लेखनीय आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आपल्या संविधान निर्मात्यांची व्यापक दृष्टी आहे, ज्यांचे योगदान देशाच्या भावी वाटचालीसाठी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील. राज्यघटनेच्या पूर्णत्वाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची ओळख, नागरी कर्तव्ये व अधिकार याबाबत माहिती व्हावी, तसेच राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सहा हजार महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर ‘संविधान गौरव महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
संविधान गौरव महोत्सव विविध उपक्रम
- संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमधून तज्ज्ञांच्या व्याखानांचे आयोजन करणे,
- “भारतीय राज्यघटनेची ओळख” या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, प्रश्नमंजुषा, पोस्टर / भित्तीपत्रके स्पर्धांचे आयोजन, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.
- महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ज्ञ यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजन.
- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी सर्व सामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवावी या करिता जनजागृती अभियान राबविण्यात येणार.
- राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटने विषयी व्याख्याने आयोजित करण्यात येणार.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/