Home ताज्या बातम्या भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

0
भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 : स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करतानाच देशाच्या प्रगतीसाठी हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालनही कसोशीने करण्याचा निर्धार आजच्या दिनी करुया, असे आवाहन  विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्‍ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्ती नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्तीसह हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम असल्याचे सांगून डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेद्वारा न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्या शहिद हुतात्मे व महापुरुषांचे व स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण होणे आवश्यक आहे यासाठी अमृत महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.

भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता व एकतेचे प्रतिक आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या गौरवशाली इतिहासाचे, येथील शौर्य, ज्ञानसंपन्नतेचा वारसा तसेच प्राचीन वैभवाचे प्रतिक आहे. समस्त भारतीय नागरिकांचा हा अभिमान व अस्मिता आहे. त्यामुळे यंदा ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान सर्वदूर राबविण्यात येत आहे. केवळ शासकीय व निमशासकीय कार्यालयेच नव्हे तर खाजगी आस्थापना, स्वयंसेवी संस्था, उद्योग, कारखाने यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. शहरांबरोबरच खेडोपाडीही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. घराघरांवर राष्ट्रध्वज फडकल्यामुळे देशभक्ती व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असल्याचे डॉ. पांढरपट्टे यावेळी म्हणाले.

स्वराज्य महोत्सवात स्वच्छता मोहिम, महिला मेळावे, शेतकरी मेळावे, विविध विषयांवरील शिबिरे, वृक्षारोपण व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विविध विभागांकडून आयोजित करण्यात आले आहे असे, डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले. दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता देशभर एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार असून त्याद्वारे राष्ट्राला अभिवादन केले जाणार आहे. यात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे शासन, प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करुन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात कोरोनासारखी महामारी आपण अनुभवली. शासन- प्रशासन, संस्था व नागरिकांच्या सर्वंकष प्रयत्नांनी कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. या महासंकटाने आम्हाला खंबीर बनविले, अनेक गोष्टी शिकविल्या. या काळातील प्रत्येक संकटावर मात करत आपण सर्वजण एकजुटीने पुढे जात आहोत. समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे.

देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गतकाळाबद्दल सिंहावलोकन व पुढच्या 25 वर्षातील प्रगतीबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधांसह प्रत्येक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. जिल्हा पातळ्यांवर नवनव्या उद्योग व्यवसायांना चालना देत असतानाच पायाभूत सुविधांमध्ये समृद्धी महामार्गासारखा विशाल प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. प्रगतीचा आलेख असा उंचावत असताना ती सर्वसमावेशक असावी यासाठी सामाजिक न्यायाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे डॉ. पांढरपट्टे यावेळी म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत लोकसहभागाचाही महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. ही विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक व गतिमान करण्यासाठी नागरिक म्हणून प्रत्येकाने हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालनही कसोशीने केले पाहिजे. तसा निर्धार स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाचे संस्मरण करून आजच्या दिवशी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कारामध्ये तिवसा तालुक्यातील तलाठी सदानंद मस्के, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तलाठी अरुण अर्बट यांना सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले.

अपर आयुक्त निलेश सागर, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदळे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

000