
प्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा-राज्यपाल राधाकृष्णन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षान्त समारंभ
छत्रपती संभाजीनगर दि.२२ – वेगाने विकास होत असलेला आपला भारत देश विकासाच्या अमर्याद संधी असलेला देश आहे. या संधी युवक युवतींनी ओळखाव्या व आपल्या व देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे,असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षान्त समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. विजय फुलारी उपस्थित होते.
श्री. धनखड म्हणाले की, गेल्या दशकात देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती केली आहे. आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था झालो असून तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहोत. देशात प्रचंड क्षमता असून आता आपण विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहोत. पायाभूत सुविधा, दळणवळण, इंटरनेट सुविधा, तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करुन आपण पुढे जात आहोत. जगाच्या एकूण व्यवहारापैकी १५ टक्के आर्थिक व्यवहार आपल्या देशात होत आहेत. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या विकासाच्या संधी जोपर्यंत देशातील युवकांना लक्षात येत नाही तोपर्यंत वेगाने पुढे जाता येत नाही. युवकांसमोर अमर्याद संधी आहेत. ग्रामीण भागातून, लहान शहरातून स्टार्ट अप पुढे येत आहेत. सागरी तंत्रज्ञान ते अंतरीक्ष तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रात संधी आहेत. विकसित भारत हे आपले स्वप्न असून त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. नव्या संधींचा उपयोग करीत देशाच्या विकासाचे नेतृत्व युवकांनी स्वीकारणे आवश्यक आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठाला असलेले नाव आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव शहराला असल्याने इथे भेट देणे विशेष असल्याचे नमूद करून उपराष्ट्रपती श्री.धनखड म्हणाले,वैयक्तिक प्रयत्न, पालक आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने स्नातकांना यश मिळाले आहे. दीक्षान्त समारंभ म्हणजे शिक्षणाचा अंत नव्हे. शिक्षण हे आयुष्यभर सुरुच राहणार आहे, हे लक्षात ठेवून जीवनात सातत्याने ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करावा. विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे. या महान विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने या प्रक्रियेत आपले योगदान देणे गरजेचे आहे.
राष्ट्रप्रथम हाच प्रगतीचा विचार
राष्ट्र प्रथम हा विचार करून दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्याला वेगाने आणि निश्चयाने पुढे जावे लागेल. सामाजिक सहचर्य, विविधतेत एकता, सांस्कृतिक मूल्यांची जपणूक, ज्येष्ठांचा सन्मान, पर्यावरण रक्षण या मुल्यांचा अंगिकार करुन आपण प्रगती करु शकतो. स्वदेशी, भारतीयत्वाचा अभिमान आणि समर्पित भावनेद्वारे देशाला सर्वोच्च स्थानावर पोहोचविता येईल. देश विरोधातील शक्तींना बाजूला सारून हे साध्य करता येईल, यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागेल.
देशाला अस्थिर करणाऱ्या बाबींपासून आपल्याला सजग राहावे लागेल. भारतात प्रगतीच्या अनेक संधी असल्याने जगाचे लक्ष आपल्याकडे आहे. विद्यापीठाने या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांना पंख फुटतील आणि ते यश संपादन करू शकतील. प्रत्येक युवक-युवतीने आपल्या क्षमता ओळखून या संधींचा उपयोग करून यशस्वी व्हावे. आपल्या पालकांना आनंदाचे क्षण द्यावे. जीवनातील अपयश तात्पुरते असते, आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यावर मात करता येईल, अशा शब्दात उपराष्ट्रपत धनखड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करा- राज्यपाल राधाकृष्णन
राज्यपाल तथा कुलपती राधाकृष्णन यांनी स्नातकांना दीक्षान्त संदेश दिला. ते म्हणाले की, जीवनातील विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला पदवी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या शिक्षणाचा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा देशाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा. आपले आईवडील, गुरुजन यांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा. सत्याधारीत कृती करतांना जीवनात चांगल्या गोष्टींचे अनुसरण करावे, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.फुलारी यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांचे स्वागत केले.
पीएम उषा मेरु योजनेअंतर्गत चार इमारतींचे भूमिपूजन
उपराष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पी.एम.उषा मेरु योजने अंतर्गत मंजूर चार इमारतींचे दृकश्राव्य पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यापीठाला १०० कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. यामध्ये ’स्ट्रेस बस्टर रिक्रेशन फॅसिलीटी सेंटर’ (९ कोटी ४८ लाख), सेंटर फॉर फोक अॅकण्ड कल्चरल स्टडीज ऑफ मराठवाडा (६ कोटी ६२ लाख), स्टूडंटस् फॅसिलीट इन लायब्ररी अॅअण्ड रिडींग रुम (३ कोटी ७५ लाख) तसेच सेंटर फॉर डिजीटल ट्रासफॉर्मेशन (७ कोटी ७४ लाख) अशा चार इमारतीचा समावेश आहे.
‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण
या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा, चिकु व जांभुळची रोपे लावण्यात आली.
५६ हजार १२२ पदवीधारक
दीक्षान्त समारंभात ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२३ व मार्च-एप्रिल २०२४ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान पीएच.डी प्राप्त करणा-या एकशे सहा संशोधकांनी पदव्यांचे वितरण करण्यात आले.यंदाच्या दीक्षांत सोहळयास पदवी प्राप्त करण्यासाठी एकुण ५६,१२२ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र दाखल केले. यामध्ये पदवीधर ४२ हजार ६६६, पदव्यूत्तर पदवी १३ हजार १८७, एम.फिल धारक १६ व पीएच.डी. धारक १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी, डॉ.कुलसचिव प्रशांत अमृतकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक उपस्थित होते.
०००००