हायलाइट्स:
- भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोप
- शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- सर्वांनीच संयम राखण्याची गरज – संजय राऊत
वाचा:कोल्हापूरमध्ये आता नवे संकट! पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
चिपळूणमधील मुख्य बाजारपेठेत मुख्यमंत्री पूरग्रस्तांशी संवाद असताना एक महिला पोटतिडीकनं आपली व्यथा मांडत होती. तिथं मुख्यमंत्र्यांकडं मदतीची मागणी केली. ‘मदत केल्याशिवाय जाऊ नका. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार देऊ नका, पण आम्हाला मदत करा, असं ही महिला म्हणाली. महिलेचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं व तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, असं सांगितलं. त्याचवेळी तिथं असलेले भास्कर जाधव हेही बोलले. ‘आमदार, खासदारांच्या पगारानं तुमचं नुकसान भरून निघणार नाही. तुझ्या आईला समजाव,’ असं जाधव संबंधित महिलेच्या मुलाला म्हणाले. त्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. जाधव यांच्यावर दमदाटी केल्याचा आरोप होत आहे.
वाचा: ‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेकांना धनवान केलंय, त्यांनी आता दिलदारी दाखवावी’
याबाबत विचारलं असता खासदार राऊत यांनी सावध उत्तर दिलं. ‘भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. वृत्तपत्रांमधून वाचलं. त्यावर स्वत: भास्कर जाधव बोलतील. पूरग्रस्तांच्या वेदना, आक्रोश आम्ही समजू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री पाऊस व चिखलाची पर्वा न करता पूरग्रस्तांना धीर देत आहेत. अशावेळी सर्वांनीच संयम राखण्याची गरज आहे,’ असं ते म्हणाले. ‘सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राला सहस्त्र हातांनी मदत होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
वाचा: ‘दुसऱ्याच्या घरात दु:ख असताना आपण आनंद कसा साजरा करायचा?’