भिंतीवर सुसाईड नोट लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने संपविले जीवन

- Advertisement -

अंबाजोगाई : ‘आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून अंबाजोगाईतील बारावीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी योगेश्वरी नगरी भागात उघडकीस आली. 

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुप्रसादचे वडील अंबाजोगाई येथीलच एका शाळेत शिक्षक आहेत. गुरुप्रसादच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यामुळे घरात फक्त तो आणि त्याचे आई-वडीलच असतात. हे कुटुंब योगेश्वरी नगरीमध्ये ‘शरयू’ इमारतीमध्ये राहते. गुरुप्रसाद सध्या योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती आणि वडील शाळेत होते. दुपारी ४ वाजताच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेतला.

सायंकाळी ७ वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून गुरुप्रसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अभ्यासाच्या ताणापायी कोवळ्या वयाच्या गुरुप्रसादने जीवन संपविल्याच्या घटनेमुळे सर्वजण स्तब्ध झाले आहेत. 

‘आय क्विट..’ :
“या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, दड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)” अशा आशयाचा संदेश गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे. या संदेशातून तो किती तणावाखाली होता हे स्पष्टपणे जाणवत आहे.

- Advertisement -