Home ताज्या बातम्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा

0
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा

मुंबई, दि. १९ : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजन, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, समितीचे समन्वयक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मतदान करण्याची शपथ दिली.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. याबरोबरच नव मतदारांच्या नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी नियुक्त स्वीप समितीचा कृती आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नियमितपणे बैठक होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी समितीचे समन्वयक श्री. महाजन, डॉ. दळवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विविध विभाग प्रमुखांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध सूचना केल्या.

०००