नागपूर दि.01 : मतदार यादीत आधार क्रमांक जोडून लोकशाही यंत्रणा अधिक बळकट, सुटसुटीत व नेमकी करण्याच्या अभियानास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी या अभियानाला केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी आर.विमला यांनी हे अर्ज स्वीकारले. सर्व नागरिकांनी या ऐच्छिक अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन गडकरी व कुटुंबातील सदस्य तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, यांनी नमुना ६ ब अर्ज भरून जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडे सादर केला.
आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासून मतदार यादीस आधार क्रमांक जोडणी मोहीम नागपूर जिल्ह्यात सुरू झाली. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल सारंग, मतदार नोंदणी अधिकारी हेमा बडे,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चैताली सावंत उपस्थित होते.
मतदार यादीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी नावे असणे व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. मतदार यादीची स्वच्छता मोहीम या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सर्व मतदारांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000