Home ताज्या बातम्या मनरेगाने दिली जिल्ह्यातील मजूरांना रोजगाराची हमी

मनरेगाने दिली जिल्ह्यातील मजूरांना रोजगाराची हमी

चालू वर्षात गाठला ४० हजार मजूर प्रतिदिवस उपस्थितीचा उच्चांक

नाशिक दि. २१ जून : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात, राज्यात बंदीचे सावट सुरू असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या मजूर वर्गाला मनरेगामुळे दिलासा मिळाला आहे. त्यासाठी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावपातळीवरच सध्या २ हजार ५४८ कामांच्या माध्यमातून १७ हजार ११७ मजुरांना रोजगाराची निर्मिती करून देण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात जिल्ह्याने चालू वर्षात ४० हजार मजूर प्रति दिवस उपस्थितीचा आतापर्यंतचा उच्चांकही गाठला आहे.

मनरेगा योजनेच्या माध्यमातूनच तहसील यंत्रणेच्या अंतर्गत गेल्या सप्ताहात (१० ते १७ जून ) प्रत्येक तालुक्यात रोपवाटिका तयार करणे, वृक्ष लागवड, रोपवन, तुती लागवड, फळबाग लागवड, गांडूळ खत, नाडेफ, वनतळे, भात खाचरं, गाळ काढणे अशा वेगवेगळ्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची  ७२० कामे सुरू आहेत. याकामांवर ३ हजार ५८१ उपस्थित मजूरांना रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांची मिळून सर्वाधिक फळबाग लागवडीची ४६१ कामे  सद्यस्थितीत सुरू असून या कामांच्या माध्यमातून १ हजार ४३८ मजुरांच्या हाताला रोजगार मिळाल्याने मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला आहे व त्यामुळे मजुरांचे होणारे स्थलांतरही थांबले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत मनरेगाच्या कामांची मागणी वाढली

जिल्हा परिषदेच्याअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर मनरेगाची १९ जून २०२० पर्यंत एकूण २ हजार ३८९ वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची कामे सुरू असून या कामांच्या मदतीने २२ हजार २५४ मजुरांना गाव पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे. आजच्या परिस्थितीत मनरेगाअंतर्गत गावपातळीवर रस्ते, वृक्ष लागवड, विहिरी, गाळ काढणे, शौचालय बांधकाम, पोल्ट्री, कॅटल व गोट शेड, घरकुल, शालेय क्रीडांगण, विहीर पुनर्भरण, दगडी बांध, गॅबियन बंधारा, शोष खड्डे, व्हर्मी कंपोस्ट, वॉल कंपाऊंड, माती नाला बांध, शेततळे अशा विविध कामांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गावाकडे परतलेल्या मजुरांना गावपातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. १० ते १७ जून या कालावधीत सर्व तालुके मिळून गावपातळीवर घरकुल बांधण्याची सर्वाधिक १ हजार ५३५ कामे सुरू असून या कामांमुळे ६ हजार १२३ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

गावपातळीवर विविध कामे सुरू

तहसील व ग्रामपंचायत या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मनरेगा  योजनेच्या अंतर्गत १० ते १७ जून याकालावधीत तहसील व ग्रामपंचायत पातळीवर  रोपवाटिकेच्या २४ चालू कामांवर ४९६ मजुर,  रस्त्यांच्या ३२ कामांवर १ हजार २९७ , वृक्ष लागवडीच्या २७१ चालू कामांवर १ हजार ८६१,  विहिरींच्या १६ कामांवर १६२,  गाळ काढण्याच्या ८० कामांवर ४ हजार ५००,  शौचालय बांधकाम ३ कामांवर १२, पोल्ट्री, कॅटल व गोट शेड मिळून ४८ कामांवर ३०५, घरकुल बांधकामाच्या १ हजार ५३५ कामांवर ६ हजार १२३, शालेय  क्रीडांगणाच्या २ कामांवर ४५, विहीर पुनर्भरणाच्या २२ कामांवर ११९, दगडी बांधाच्या २३ कामांवर २०६, फळबाग लागवडीच्या ४६१ कामांवर १ हजार ६३३, गांडूळ खत व नाडेफ मिळून ५ कामांवर १७,  वॉल कंपाउंड, माती नाला बांध व  शेततळे अशा ७ कामांवर मिळून १६१ मजुर  उपस्थित आहेत. गेल्या सप्ताहात तहसील व ग्रामपंचायत यंत्रणा मिळून २ हजार ५४८  कामांच्या माध्यमातून १७ हजार ११७ मजुरांना रोजगार उपलब्ध  झाला असल्याची माहिती यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे.

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मागणीप्रमाणे दिला रोजगार

नाशिक जिल्ह्यात एप्रिल, २०२० अखेर साधारण १० हजार मजूर उपस्थित होते. परंतु लॉकडाउननंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच नाशिक जिल्ह्याच्या बाहेरगावी गेलेले मजूर मूळगावी परतल्याने, सर्वसाधारण भागाबरोबरच सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासी भागातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. त्यानुसार माहे जून, २०२० मध्ये ग्रामपंचायतीमार्फत साधारण ३ हजार ६०० कामे सुरू करून ३८ हजार मजुरांना रोजगार देण्यात आला आहे. त्यात सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक स्वरूपाच्या कामांची विशेषत: कृषी, जलसंधारणाच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. योजनेची सुरुवात झाल्यापासून यावर्षी सर्वात जास्त रोजगाराची मागणी करण्यात आली असून त्यासर्वांना रोजगार उपलब्ध करून देऊन मजुरीही वेळेत देण्यात आली आहे. – रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)

लक्षणीय:

  • गावपातळीवरच सध्या २ हजार ५४८ कामांच्या माध्यमातून १७ हजार ११७ मजुरांना रोजगाराची निर्मिती करून देण्यात आली आहे.
  • कोरोना संकट काळात जिल्ह्याने चालू वर्षात ४० हजार मजूर प्रति दिवस उपस्थितीचा आतापर्यंतचा उच्चांकही गाठला आहे.
  • चालू सप्ताहात वेगवेगळ्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची  ७२० कामे सुरू आहेत. याकामांवर ३ हजार ५८१ उपस्थित मजूरांना रोजगार प्राप्त झाला आहे.
  • सर्वाधिक फळबाग लागवडीची ४६१ कामे सद्यस्थितीत सुरू असून या कामांच्या माध्यमातून १ हजार ४३८ मजुरांच्या हाताला रोजगार.
  • ग्रामपंचायतस्तरावर मनरेगाची १९ जून २०२० पर्यंत एकूण २ हजार ३८९ वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची कामे सुरू; २२ हजार २५४ मजुरांना गाव पातळीवर रोजगार.
  • घरकुल बांधण्याची सर्वाधिक १ हजार ५३५ कामे सुरू असून या कामांमुळे ६ हजार १२३ मजुरांच्या हाताला मिळाले काम.