Home ताज्या बातम्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज

0
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले नाही, असे कारण देऊन अँटिलिया विस्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने जामीन मिळण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी मुदतीची गरज आहे, असे सांगून ‘एनआयए’ने वाझेच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला आहे. याविषयी, आता न्यायालय २२ जुलै रोजी सुनावणी घेणार आहे.

‘या प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलमे लागू करण्यात आली आहेत. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिक अवधी असतो. तसेच, या प्रकरणात बरीच माहिती व तपशील असल्याने आरोपींविरोधात ठोस पुरावे मिळण्यासाठी सर्व बाबींची तपासणी सुरू आहे. सर्व अंगांनी अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी अवधी आवश्यक असून या टप्प्यावर आरोपीला जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होईल,’ असे ‘एनआयए’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे २२ जुलैच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार आढळली होती. ती कार १८ फेब्रुवारी रोजी मुलुंड-ऐरोली पुलावरून चोरण्यात आली होती, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, या कारचे मालक हिरन मनसुख यांचा मृतदेह ५ मार्च रोजी कळवा खाडीत आढळला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ८ मार्च रोजी एनआयएने ताब्यात घेतला. एनआयएने तपासातील माहितीच्या आधारे अँटिलिया विस्फोटके प्रकरणात वाझेला १३ मार्च रोजी अटक केली. मनसुख हत्या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने वाझेचा अटकपूर्व जामीन अर्ज १२ मार्च रोजी फेटाळला.

पूर्वी ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर वाझेला निलंबित केले होते. जवळपास १७ वर्षांच्या निलंबनानंतर त्याला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आले. आता या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

Source link