Home ताज्या बातम्या ‘मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही ‘नवनिर्माण”

‘मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही ‘नवनिर्माण”

0

मुंबई : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक बदल होताना काही काळात दिसणार आहेत. येत्या २३ तारखेला मनसेचं मुंबईत पहिला महाधिवेशन भरणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील संघटनेत तसेच भूमिकेत बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी कार्डचा प्रभाव निवडणुकीच्या निकालात दिसत नसल्याने मनसे सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळणार असल्याचीही चर्चा आहे. 

याबाबत बोलताना मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, राज ठाकरेंचे भाषण सगळ्यांना ऊर्जा देणारं असेल, त्यामुळे २३ तारखेची वाट पाहावी लागेल. पक्षस्थापनेवेळी ज्या संकल्पना होत्या त्या काही राहिल्या असतील. पण पक्षाला १२ वर्ष पूर्ण झाली आहे. निश्चित काही बदल घडेल. त्यावेळी ज्या संकल्पना मांडता आल्या नाही त्या आता मांडल्या जातील असं त्यांनी सांगितले. 

तसेच मनसे नव्याने उभारी घेईल हे सत्य आहे. सर्वच स्तरावर मनसे बदलेली असेल हे नक्की आहे. धोरणात्मक आणि अमुलाग्र बदल होताना पक्षात दिसतील. पक्षाचे इंजिन चिन्ह भविष्यातही तेच राहील यात अडचण नाही. मात्र १२ वर्ष झाल्यानंतर संघटनेत बदलत्या काळानुसार काही बदल करणं योग्य वाटतं ते आम्ही करत आहोत. नवीन ऊर्जा, नवीन बळ देणारी संघटना २३ तारखेला सगळ्यांना दिसेल असं सांगत नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. 

Image result for mns raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती त्यावेळी मनसेच्या झेंड्यामध्ये त्यांनी निळा, भगवा आणि हिरवा असा रंग घेतला होता. त्यावेळी या झेड्यांची भूमिका राज यांनी स्पष्ट केली होती. मात्र २००९ चा अपवाद वगळता राज ठाकरे यांच्या मनसेला निवडणुकीत प्रभावीपणे यश मिळविता आले नाही. मात्र आता राज्यातील परिस्थिती बदलल्यामुळे राज ठाकरे आपल्या भूमिकेतही बदल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Image result for MNS

भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या संघर्षावरुन भाजपा-शिवसेनेत तणाव वाढला. हा तणाव टोकाला गेल्याने शिवसेनेने आघाडीशी जुळवून घेत महाविकास आघाडीची स्थापना केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाची असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पक्ष गेल्याने शिवसेनेचा नाराज मतदार खेचण्याची तयारी मनसेने केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. भविष्यात मनसे-भाजपा एकमेकांच्यासोबत येतील असंही बोललं जातं आहे. त्यामुळे २३ जानेवारीला राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

Image result for MNS