ममता जिंकल्या! आता करोनाकडे लक्ष देऊया: उद्धव ठाकरे

ममता जिंकल्या! आता करोनाकडे लक्ष देऊया: उद्धव ठाकरे
- Advertisement -


मुंबईः संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या यशानंतर राष्ट्रीय पातळीवरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकाद्वारे त्यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केलं आहे, तर देशात वाढत चालेल्या करोना संसर्गाकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

‘ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘ममता दीदींनी दाखवून दिलं मोदी- शहांनाही पराभूत करता येऊ शकतं

‘पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकटवली. त्या सर्व शक्तींची धुळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तर, आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून करोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनंही पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर हा निर्णय बदलण्यात आला होता. व भाजपवर मात करण्यासाठी शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.



Source link

- Advertisement -