मराठवाडा मुक्ती लढ्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष, मोठ्या उत्साहात साजरे करुया – कामगार मंत्री सुरेश खाडे – महासंवाद

मराठवाडा मुक्ती लढ्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष, मोठ्या उत्साहात साजरे करुया – कामगार मंत्री सुरेश खाडे – महासंवाद
- Advertisement -

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यावर आधारीत “हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि मी” आणि “मराठवाड्याचा मुक्ती लढा आणि हैद्राबाद संस्थान” या दोन पुस्तकाचे प्रकाशन

लातूर दि.17(जिमाका) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 74 वर्षे पूर्ण झाले असून हे अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाड्यातील जनतेच्या मुक्ती लढ्याला अनन्य साधारण असे महत्व आहे. या लढ्यातील हुतात्म्यांना, या लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो. हा लढा आजच्या पिढीला कळावा म्हणून या अमृत महोत्सवी वर्षात व्यापक कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आपल्या संदेशात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, भारताला 15 ऑगस्ट, 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु हैद्राबाद, काश्मिर व जुनागढ संस्थांनातील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. हा लढा 13 महिने सुरु होता व या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता, त्यावेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी 17 सप्टेंबर, 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले.

लातूरकरांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख

हैद्राबाद मुक्ती संग्रामात लातूरकरांचे योगदान खूप महत्वाचे आहे. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात लातूरचा समावेश होता. मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे. त्या परिषदेचे लातूरमध्ये दुसरे व सहावे अशी दोन अधिवेशने झाली. या भागात आर्य समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. औराद, निलंगा, होडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर, देवणी, वलांडी, बोळेगाव, घोणसी, तिरुका, कौळखेड अशा अनेक ठिकाणी रझाकारांशी दिलेली झुंज व गाजवलेला पराक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच असल्याचे गौरवोदगार कामगार मंत्र्यांनी काढले.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात गोविंदराव नानल, दिंगबरराव बिंदू, मुकुंदराव पेडगांवकर, भाऊसाहेब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ, देवीसिंग चौहान, काशिनाथराव वैद्य, बाबासाहेब परांजपे, राघवेंद्र दिवाण, अनंत भालेराव, श्रीनिवास शर्मा, श्रीधरराव नाईक, फूलचंद्र रामचंद्र गांधी या प्रमुख नेत्यांच्या पुढाकारातून हा लढा लढला गेल्याचे स्मरणही त्यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमानी साजरे होणार. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 2022-2023 हे अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे स्मारक व तालुक्यातील करावयाचे स्मृती स्मारक, जिथे मुक्ती संग्रामातील महत्वाच्या घटना घडल्या, त्या ठिकाणी स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहेत.तसेच शालेय स्तरापासून ते महाविद्यालय स्तरापर्यंतच्या मुलांना मुक्ती संग्राम माहिती व्हावा यासाठी व्याख्याने, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. मुक्ती संग्रामाचे महत्व सांगणारा एका तासाचा माहितीपट गावोगावी दाखविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे कामगार मंत्री यांनी यावेळी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्षात नगर परिषदा कचरा मुक्त होणार

प्रदूषण हे मोठे संकट आहे, ते संपविण्याची गरज लक्षात घेऊन, त्या कचऱ्याची योग्य शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी लातूर जिल्ह्यात मागच्या महिन्यापासून ‘मराठवाडा मुक्ती ते कचरा मुक्ती’हे घोष वाक्य घेऊन नगर परिषदा आणि नगर पंचायती कचरा मुक्त करण्याचा निर्णय झाला होता. त्या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती कचरा मुक्तीच्या मार्गावर असून त्या झिरो होतील यासाठी जिल्हा प्रशासन काम करणार असल्याचेही मंत्र्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा

लातूर जिल्ह्यामध्ये चालु खरीप हंगामात 4 लाख 83 हजार 897 शेतकऱ्यांचे 3 लाख 9 हजार 70 हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी अतिवृष्टी, पूर, शंखी गोगलगाय यामुळे झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून रुपये 130 कोटी 34 लाख 63 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे नियमाप्रमाणे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगून लातूर जिल्ह्यामध्ये लम्पी चर्म रोग या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव पशुधनामध्ये दिसुन येत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 6 तालुक्यामधील 46 गावांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळुन आला आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या रोग नियंत्रणासाठी प्रादुर्भाव केंद्रबिंदु पासुन पाच किलोमीटर परिसरातील पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत 55 हजार लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील 30 हजार 786 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी टप्या टप्याने लसमात्रा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी नमुद केले.

स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांचा सक्रिय सहभाग होता असे शंखहरी जीवनधर शहरकर, विठठल गोविंद आर्य, लातूर, नागु अंकुश घोडके माटेफळ ता. जि. लातूर, नामदेव दत्तू खोसे माटेफळ ता. जि. लातूर, नागनाथ बाबुराव टेकाळे गांजुर ता. जि. लातूर, पिराजी महादू तोगरे घोणसी ता. जळकोट, कै.बाबाराव मालुसरे यांच्या पत्नी श्रीमती अनुसयाबाई बाबाराव मालुसरे घोणसी ता. जळकोट यांचा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि अमृत महोत्सवी वर्षाचे स्मृतीचिन्ह भेट देऊन गौरव केला.
यावेळी दयानंद महाविद्यालयाच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारीत संक्षिप्त नाटीका सादर करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभागाकडून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत लालबहाद्दूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर येथील मानस संजय देशमुख या विद्यार्थ्यास प्रथम क्रमांक आल्या बद्दल तर श्रीराम विद्यालय, रेणापूर येथील धैर्यशील देविदास कातळे या विद्यार्थ्याचा चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला म्हणून राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारीत दोन पुस्तकाचे प्रकाशन
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात सक्रिय सहभाग असलेले स्वातंत्र्य सैनिक कालिदास देशपांडे यांनी लिहलेली त्या काळातील डायरी त्यांचे चिरंजीव प्रा. निशिकांत देशपांडे यांनी संपादन केलेले आणि मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ” हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मी ” या पुस्तिकेचे आणि ” मराठवाड्याचा मुक्ती लढा आणि हैद्राबाद संस्थान” हे प्रा. चंद्रशेखर लोखंडे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.
**

- Advertisement -