मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण  – महासंवाद

    - Advertisement -

    • संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशासन तत्पर
    • सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार

    परभणी, दि. १७ (जिमाका): मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जपवणूक करत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी केले.

    जिल्ह्यात पर्जन्यमानात घट झाली असली, तरी शेतकऱ्यांनी संभाव्य टंचाईच्या परिस्थितीला घाबरू नये. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत शासन खंबीरपणे पाठीशी असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, असा दिलासाही पालकमंत्री यांनी दिला. तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा निश्चितपणे पोहोचविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    परभणी येथील सी. राजगोपालचारी उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, खासदार संजय जाधव, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, स्वातंत्र्यसैनिकांसह वीरपत्नी, वीर माता-पिता, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने शोकधून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

    पालकमंत्री म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा नव्हे तर, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य व सामाजिक हक्कासाठीचा लढा होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या या त्यागाची जाणीव ठेवून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून महिनाभर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जनसहभाग वाढविणे आणि विविध क्षेत्रातील विकासकामांची माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५२ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ४०८ कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्येही लवकरच रक्कम जमा होणार आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा काढून संरक्षित केली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १७३ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ हजार २९८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन शेती अधिक सक्षम व समृद्ध करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

    सेवा संकल्प अभियान’ हे शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकरी, युवक, महिला, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाच्या संधी अधिक सुलभ करण्याचे माध्यम ठरणार आहे. नागरिकांनी अभियानातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

    सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आजपासून जिल्ह्यात ‘क्षयरोगमुक्त परभणी जिल्हा व नेत्र तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच नागरिकांनीही आयोजित आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

    परभणी ग्रोथ हबच्या माध्यमातून नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. परभणीच्या उद्योग विकासासाठी सोळाशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव दाखल केले असून, सुमारे १६२ उद्योग घटकांनी सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून १५ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गुंतवणूक जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    परभणी जिल्ह्यातील चालुक्य व यादवकालीन मंदिरे, बारवा, साईबाबा व संत जनाबाई यांची जन्मस्थळे असून, सोबतच जांभूळबेटसारखी नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना देशपातळीवर प्रसिद्धी देण्यासाठी विमानतळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनीय भागात याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना गाईड म्हणून रोजगार, तसेच न्याहारी, निवास, स्थानिक उत्पादने आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

    आरोग्य, ऊर्जा, महिला व बालविकास, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार या क्षेत्रात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा रुग्णालयातील नवीन कॅथलॅब लवकरच सुरू होईल तर गंगाखेड व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १० खाटांचे नवीन आयसीयू कार्यान्वित झाले आहेत. जिंतूर व बोरी येथील ग्रामीण रुग्णालयांतील प्रसूती कक्षांचे अद्यावतीकरण आणि सेलू येथील नवीन स्त्री रुग्णालय, मानवत ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धनही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’अंतर्गत दि. २९ रोजी परभणी जिल्ह्यात १३ रोजगार मेळावे घेण्यात येणार असून, यामध्ये युवक-युवतींना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान यांच्या वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे वारस आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बडगुजर यांनी केले.

     

    ००००

    - Advertisement -