‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम
- Advertisement -

नवी दिल्ली, दि. ११ : ‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात दिल्लीतील मराठी अधिकारी आणि पत्रकार सहभागी होणार आहेत.

वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत, परिचय केंद्राने १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या साहित्य वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात केंद्र व राज्य शासनातील दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी आाणि मराठी पत्रकार सहभागी होणार आहेत. वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी, कविता आदी साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन परिचय केंद्राच्या ट्वीटर हँडल,फेसबुक(पेज, गृप),युट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु या समाजमाध्यमांवर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येतील.

‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून  साजरा करण्यात येतो.

वि.वा शिरवाडकरांचे  एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये  गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’  ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही  मिळाला.

कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाविषयी

कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत, जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्‍याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.

परिचय केंद्राच्या ‘मराठी भाषा गौरव दिन उपक्रम-२०२१’ विषयी

परिचय केंद्राच्यावतीने २०२१ मध्ये ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्ताने कार्यालयाच्या सर्व समाज माध्यमांहून कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला होता .यात महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य व परदेशातील साहित्य प्रेमींनी सहभाग घेतला होता.

राज्य शासनाच्या ‘‍द्वि वर्षपूर्ती’ निमित्त सद्या परिचय केंद्राची विशेष मोहीम

महाराष्ट्र शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त परिचय केंद्राच्या सर्व समाज माध्यमांहून सद्या विशेष मोहीम राबविली जात आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘दोनवर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या पुस्तिकेतील माहितीवर आधारीत ध्वनिचित्रफीत दररोज प्रसारित करण्यात येते. या मोहिमेद्वारे राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेली जनकल्याणाची कामे व राबविलेल्या जनहितकारी  योजनांची  माहिती देण्यात येत आहे.

 

0000

 

 

रितेश भुयार /वि.वृ.क्र. २९/ दि.११.०२.२०२२

- Advertisement -