Home बातम्या ऐतिहासिक मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 17 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, युती शासनाच्या काळात शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.  मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी  त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.