मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
- Advertisement -




मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती देणारे मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन सामाजिक न्याय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी झाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या लाभार्थ्यांसाठी घरकुल, सिंचन, शेती, शैक्षणिक स्वरुपाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची लाभार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने जनजागृतीसाठी सदर मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी संविधानाच्या प्रती भेट देऊन पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

सदर प्रदर्शन बुधवार दिनांक २९ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रदर्शनास भेट देऊन योजना समजून घेणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्गाटन कार्यक्रमाचे संचलन प्रा.कमलदास राठोड यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000







- Advertisement -