महाजनादेश यात्रेसाठी झाडांच्या कत्तलीबाबत संबंधितांच्या विरोधात राष्ट्रवादीओबीसी शहरअध्यक्ष संतोष नांगरेनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली तक्रार
भूषण गरुड : पुणे शहरात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत अडथळा येऊ नये म्हणून शनिवारी सकाळी अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली. सिंहगड रोड ते म्हात्रे पूल मार्गावरील मोठ्या झाडांना वाचविण्यासाठी नागरिकांनी विरोध केला तरी वृक्ष अधिकाऱ्यांनी दाद न देता वृक्षतोड केली.
सिंहगड रोड, गणेश मळा, म्हात्रे पूल, दत्तवाडी भागात रस्त्याच्या दुतर्फा उंच वाढलेली झाडे आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी केलेल्या रथाची उंची जास्त असल्याने या झाडांच्या फांद्या अडथळा ठरत होत्या.
त्यामुळे सुरक्षेसाठी प्रशासनाने झाडांच्या फांद्या छाटणे अपेक्षित होते. मात्र, वृक्ष अधिकाऱ्यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी झाडाच्या मोठ्या फांद्या, तर काही झाडे थेट बुंध्यापासूनच कापली.
सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा ते राजाराम पूल, सेनादत्ता पोलिस चौकी ते म्हात्रे पूल या मार्गावरील झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले.
यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. पण वृक्ष अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. तोडलेल्या मोठ्या फांद्या तातडीने ट्रकमध्ये भरून तेथून नेण्यात आल्या. खासदार वंदना चव्हाण यांनी फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर या घटनेची सर्व छायाचित्रे प्रसिद्ध करताच सदर घटनेची दखल घेत झाडांच्या कत्तलीबाबत संबंधितांच्या विरोधात राष्ट्रवादीओबीसी शहरअध्यक्ष संतोष नांगरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदीप शिवशरण,श्रीकांत मेमाणे,नारायण तेलंग,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.