‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लाभणार तंत्रज्ञानाचे बळ : पालकमंत्री दादाजी भुसे

‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लाभणार तंत्रज्ञानाचे बळ : पालकमंत्री दादाजी भुसे
- Advertisement -

नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका नाशिक): ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, महाज्योती नाशिकच्या प्रादेशिक अधिकारी सुवर्णा पगार, आय एम. आर. टी. चे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, शिक्षण अधिकारी (मविप्र) डॉ. विलास देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा मोबाईल, इंटरनेट डाटा उपलब्ध होऊ शकत नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅब सोबत दररोज 6 जीबी इंटरनेटचा डाटा एक वर्षासाठी मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या ग्रामीण व शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना 60 व 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना  जेईई, नीट सीईटी परीक्षांच्या अभ्यासाकरीता 593 विद्यार्थ्यांना या टॅबचे वाटप करण्यात आले. या टॅबचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीच करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे ही पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

राज्य शासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविणाऱ्यावर भर देत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन त्या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी व बालवाडी मधील विद्यार्थ्याची दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षापासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी राज्यातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भविष्यात आपल्या जिल्हा व राज्यातील अनेक मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत राज्यातील मुलींची संख्या वाढणार असून त्या आपल्या जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होण्याकरिता सुपर 50 हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रामातून ग्रामीण भागातील 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुढील शिक्षणासाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. शासन व प्रशासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. तसेच विद्यार्थी जीवनात घेतलेले निर्णय हे आयुष्याला दिशा देणारे असतात, त्यामुळे विद्यार्थी दशेत घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्यात यावा. त्याचप्रमाणे जीवनात आई-वडील, गुरुजनांचा सन्मान करून व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅबचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर यांनी केले.

- Advertisement -