
मुंबई, दि. ६ : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महानगरपालिका रुग्णालयामध्येही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया तसेच लवकर निदान (अर्ली डिटेक्शन) आणि उपचारांची व्यवस्था सुरू केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हृदय आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मलबार हिल येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेह मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशन यांनी एकत्र येऊन हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, टीव्ही 9 मराठीचे इनपुट एडिटर मोहन देशमुख, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे, एनडीटीव्ही मराठीचे जितेंद्र दीक्षित, लोकशाही न्यूजच्या संचालक अंजनी नायडू, एबीपी माझाच्या संपादक श्रीमती सरिता कौशिक आणि लोकसत्ताचे माजी सहयोगी संपादक संदीप आचार्य यांच्यासह उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी, डॉक्टर, उपचार घेतलेल्या बालकांचे पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महानगरपालिकेस या योजनेसाठीचा काही खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेने आता निदानाची सुविधाही सुरू केली आहे. अशीच व्यवस्था इतर महानगरपालिकांमध्येही केली जाईल. वेळेत शस्त्रक्रिया झाली तर मूल ऐकू आणि बोलू शकते आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. त्यामुळे ही काळाची आणि समाजाची गरज आहे.
दिवंगत अभिनेता नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार हेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी श्रीनगरमधील ७२ मुलांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. या मुलांना मुंबईत आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जातील. रुग्ण देशाच्या कोणत्याही भागातील असो, त्याच्यावर उपचार होतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आपले मूल ऐकू किंवा बोलू शकत नाही, किंवा त्याच्या हृदयाला छिद्र आहे, हे कळल्यावर पालकांना बसलेला धक्का तेच समजू शकतात. अशा कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन गेली नऊ वर्षे उभे आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे मंगेश चिवटे आणि सर्व कार्यकर्ते घेत असलेल्या परिश्रमाचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी कौतुक केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही टीम राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये पोहोचली. गडचिरोलीपासून सांगलीपर्यंत गावोगावी जाऊन मुलांचे निदान केले, त्यांना मुंबईत आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या मुलांनी ठाण्यात सादर केलेल्या नाटकाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री भावुक झाले. ते म्हणाले, अशी मुले किती हुशार असतात, हे त्या नाटकातून दिसले. त्यांना फक्त मदतीचा हात हवा असतो. कॉक्लिअर इम्प्लांट झालेली एक मुलगी आयआयटीत गेली, तर एका मुलाची इस्रोमध्ये निवड झाली. असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या आदित्य ठोसर याने लिहिलेल्या ‘माय वर्ल्ड ऑफ साउंड’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुलांना नवीन आयुष्य देणाऱ्या डॉक्टरांचा तसेच माध्यम प्रतिनिधींचाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यंदा दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि यावेळी आपणही शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कधी काळी हृदयाला छिद्र असल्याने ज्यांच्या आयुष्याची काळजी वाटत होती, तर कधी आवाजाचे जग ज्यांच्यासाठी बंद होते, अशी चिमुकली मुले आज हसत-खेळत दिवाळीचा आनंद घेत होती. पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणि मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य, अशा भावनिक वातावरणात हा दिवाळी स्नेह मेळावा पार पडला. गेल्या ९ वर्षांत या उपक्रमांतून महाराष्ट्रातील ११ हजार लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि २ हजार कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या मुलांची आस्थेने विचारपूस केली, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला आणि पालकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून उपचार घेतलेल्या रुग्णांनी पाठवलेल्या ५१ हजार आभारपत्रांचे “देवदूताची आभारपत्रे तुला” हे संकलन यावेळी लक्षवेधी ठरले. मुलांना आणि पालकांना उपमुख्यमंत्री श्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. उपस्थितांसाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही करण्यात आले.
००००

WhatsApp