नगर: नगर-पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक परिसरातील विस्कळित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ भाजपच्या स्वपक्षीय नगरसेवकांनीच आंदोलनाचा इशारा दिल्याने अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी स्वतः उभे राहून या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम करून घेतले.
कायनेटिक चौक परिसरातील विविध कॉलन्यांमधील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापौरांच्या दालनात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे केडगावचे नगरसेवक मनोज कोतकर व राहुल कांबळेंनी दिला होता. त्यानंतर कायनेटिक चौक परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कायनेटिक चौक परिसराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन स्टेशन रस्त्यावरील मल्हार चौकात नादुरुस्त असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यावर स्वतः महापौर वाकळेंनी येथे येऊन महापालिका यंत्रणेद्वारे ही दुरुस्ती मार्गी लावली. या वेळी नगरसेवक कोतकर व कांबळेंसह सूरज शेळके, गणेश नन्नवरे उपस्थित होते. दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने करून कायनेटिक चौक परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या सूचनाही वाकळेंनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
—