मुंबई: विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या आई आणि मुलाच्या मृत्यूचा जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळत तिच्याशी असभ्यपणे वागणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली. त्यांच्या कृत्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यानंतरही याप्रकरणास वाचा फुटली आहे.
एका महिलेचा विनयभंग होत असताना निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तरीदेखील कारवाई का नाही झाली असा सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे. याबाबत मनसेचे महिलांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांना भेटले असून त्यांना महापौरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी या घटनेच्यावेळी जे पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे लोकपाशी बोलताना सांगितले. तसेच मनसेच्या शिष्टमंडळाला महिलांची सुरक्षितता हे आमचं सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे, असं आश्वासन पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलं आहे. अनेक महिला संघटना आणि राजकीय पक्ष देखील महापौरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सरसावले असून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.