Home शहरे महापौर श्री. जयवंत सुतार यांची बोनसरी, तुर्भे येथे भेट

महापौर श्री. जयवंत सुतार यांची बोनसरी, तुर्भे येथे भेट

नवी मुंबई:

सोमवार दि.08 जूलै, 2019 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नेरुळ, बोनसरी गांव व तुर्भे विभागात डोंगराखाली असलेल्या क्वारी कामगारांच्या घरात पाणी घुसुन व झोपडया वाहून जाऊन झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मंगळवार दि.09 जूलै, 2019 रोजी नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी तेथील घरांची व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधितांना निर्देश दिले.

     या प्रसंगी महापौरांसमवेत नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता   श्री. मनोज पाटील, उप अभियंता श्री. उमेश पाटील, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व श्री. सुभाष म्हसे उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे नेरुळ विभागात एस.बी.आय. कॉलनीसमोर ठाणे-बेलापूर रस्त्याशेजारी सर्विस रोडला लागून असलेल्या नाल्यात जमलेला गाळ काढून नाल्याची साफसफाई करण्यात यावी. सदर नाल्यातील केबल इतर ठिकाणी हलविण्यात यावेत. सदर नाल्यात डोंगरावरुन पावसाचे पाणी, गाळ, माती, खडी जमा झाले असून, सदर नाल्याची तात्काळ साफसफाई करण्यात यावी. तसेच याठिकाणी असलेल्या पादचारी भुयारी मार्गात पावसाचे पाणी तुंबले आहे ते काढण्यात यावे.  

मुसळधार पावसामुळे नेरुळ बोनसरी विभागात डोंगराखाली असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊन लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी येथील स्थानिक नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी यांनी या आपदग्रस्त लोकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात स्टोव्ह, आवश्यक रेशन पुरविल्याचे सांगितले. जेवढया लोकांचे घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्यांची एक यादी तयार करुन येथील स्थानिक नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी यांचेकडे देण्यात यावी, त्या अनुषंगाने या लोकांना पुढील मदत मिळणेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत कार्यवाही करण्यात येईल असे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले. तसेच या भागात मच्छरांचा प्रादुर्भाव, रोगराई वाढू नये यासाठी तात्काळ डासअळीनाशक फवारणी, धुरीकरण करण्यात यावे असे वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर यांना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी निर्देश दिले. याठिकाणी रस्ता वर आला असून, गटार खाली गेले आहे, त्यामुळे नव्याने गटार बांधण्यात यावीत. सदर ठिकाणी असलेल्या नाल्यात डोंगरावरुन दगडगोटे मोठया प्रमाणात नाल्यात वाहून आले आहेत. नाला व्हिजन अंतर्गत नवी मुंबईतील सर्व नाल्यांच्या दुरुस्तीचे, संरक्षक भिंतीचे काम हाती घेऊन नाल्यातील गाळ काढून नाल्याची खोली वाढविण्यात यावी असे निर्देश महापौर श्री. जयवंत सुतार यांनी दिले. तसेच सदर ठिकाणी असलेल्या नाल्याची संरक्षक भिंत तातडीने बांधण्यात यावी, जेणेकरुन जोराच्या पावसात पावसाचे पाणी लोकांच्या घरात जाणार नाही. मुसळधार पावसामुळे नेरुळ, जुईनगर तुर्भे एम.आय.डी.सी क्षेत्रातील ब-याच कंपन्यांमध्ये मोठया प्रमाणात पावसाचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे. त्यामुळे याठिकाणी असणा-या नाल्यातील गाळ मोठया पोकलनद्वारे काढून नाल्याची खोली वाढविण्यात यावी असे महापौरांनी सांगितले.

तुर्भे येथील ओंकारशेठ क्वारी या भागात मुसळधार पावसामुळे डोंगरावरुन जोराने पाणी येऊन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकांच्या / क्वारी कामगारांच्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. मनोज पाटील यांनी अशी माहिती दिली की, मुसळधार पावसात डोंगरावरुन येणारे पाणी व माती, खडी यामुळे येथील पाणी निचरा करणारे पाईप चोकअप होऊन पाणी उलट लोकांच्या घरात गेल्याने येथील लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डोंगरावरुन येणा-या पाण्याच्या निच-यासाठी क्वारी ठिकाणी लावण्यात आलेले पाईप तात्काळ काढण्यात यावे असे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी निर्देश दिले. तसेच जेथे-जेथे आवश्यक आहे त्याठिकाणी नव्याने नाले बांधण्याचे तसेच नाले दुरुस्तीची कामे, नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम तात्काळ प्रस्तावित करावे असे कार्यकारी अभियंता श्री. मनोज पाटील यांना महापौरांनी निर्देश दिले. 

नेरुळ विभागात लक्ष्मीवाडी येथे ठाणे-बेलापूर रस्त्याला लागून असलेल्या नाल्यात पावसात डोंगरावरुन तसेच बामनक्वॉरी व बोनसरी क्वारीमधून मोठया प्रमाणात दगडगोटे, रेती, खडी, माती व गाळ वाहून आला आहे, सदर नाल्यात पाण्याचे पाईप, केबलमुळे नाल्यातील पाणी पुढे सरकत नाही. त्यामुळे पोकलनद्वारे सदर नाल्यातील गाळ तात्काळ काढून नाल्याची सफाई करण्यात यावी. तसेच नाल्याची खोली वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे सदर नाल्यातील ठाणे-बेलापूर रोडला लागून असलेल्या कल्व्हर्टमधील केबल, तसेच पाईप इतर ठिकाणी हलविण्यात यावेत असेही महापौरांनी सांगितले.  नेरुळ एम.आय.डी.सी. क्षेत्रात महेश एक्पोर्ट कंपनी समोरील रस्त्याखालून निघणारा नाला सरळ करण्यात यावा, जेणेकरुन सदर नाल्यातील पाणी प्रवाहीत होण्यास मदत होईल अशाही सूचना महापौरांनी दिल्या.

नवी मुंबई शहराचा नांवलौकीक कायम राखताना येथील कोणत्याही स्तरांतील नागरिकास त्रास होणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महापालिका प्रशासनास दिले.