Home बातम्या ऐतिहासिक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

0
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

नागपूर दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंती दिनी राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर आज अभिवादन केले.

सर्वप्रथम त्यांनी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील त्यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन केले. त्यांच्यासोबत यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच दीक्षाभूमीवर या महत्त्वपूर्णदिनी अभिवादन सोहळ्याला आलेल्या जनतेचे स्वागत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘नेशन फर्स्ट’ अर्थात देश सर्वप्रथम सांगणारे द्रष्टे नेते होते. इंग्रजांच्या कमिशनपुढे त्यांना विचारण्यात आले होते की तुम्ही कोणत्या धर्माचे, गटाचे नेतृत्व करताय ? त्यावेळी त्यांनी बाणेदारपणे “सर्वप्रथम मी भारतीय आहे. नंतर मी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिख, ईसाई आहे, असे स्पष्ट सांगितले. सर्वप्रथम राष्ट्र याचे त्यांनी कायम समर्थन केले.

ते अत्यंत अभ्यासू आणि प्रज्ञावंत नेते होते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. आज केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांचा जयंती दिन उत्साहात साजरा केला जात आहे. समानतेचा पुरस्कार करणारी राज्यघटना त्यांनी दिली. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया असणारी ही राज्यघटना आहे. त्यांचे विचारधन ही लोकशाही उत्तरोत्तर बळकट करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी संविधान चौकात अभिवादन केले.