महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत ५६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत ५६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित
- Advertisement -

नवी दिल्ली 02 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्ष  2022-23 करिता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना 5 हजार 654 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून  लागू करण्यात आली  आहे. या योजनेअंतर्गत, दर वर्षी 6000 रुपयांचा आर्थिक निधी तीन समान भागांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. आतापर्यंत देशभरातील 11 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेतून 2 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना  आतापर्यंत 24093.431 कोटी रुपये  हस्तांतरित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना  आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 436.815 कोटी, वर्ष 2019-20 मध्ये 4,898.806 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 6671.801 कोटी ,  वर्ष  2021-22  मध्ये 6431.384 कोटी तर वर्ष 2022-23 मध्ये 5654.625 कोटी रुपये  इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. तोमर यांनी लोकसभेत दिली.

सातारा जिल्ह्यातील पीएम-किसान सन्मान निधी लाभार्थ्यांना 1295.95 कोटी रुपयांचे वितरण

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) पात्र लाभार्थ्यांची संख्या 5,49,385 आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना 1,252.95 कोटी रुपये वितरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. तोमर यांनी  लोकसभेत दिली.

000000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.142/ 02.08.2023

- Advertisement -