मुंबई दि. ४: डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणसंस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाला नवे क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, त्यांनी उभी केलेली शैक्षणिक चळवळ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठातून विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशातील हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे. देशभरात सात स्वतंत्र विद्यापीठांची निर्मिती हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई येथे उभारलेल्या अत्याधुनिक रुग्णालयांमुळे लाखो नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली. तर नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम उभारून त्यांनी क्रीडा क्षेत्रालाही नवी ओळख मिळवून दिली. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांचा समतोल विकास घडवून आणणारे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक पदाची प्रतिष्ठा वाढवली. सार्वजनिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत आणि लाखो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
0000






















WhatsApp