महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या १२ स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव – महासंवाद

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या १२ स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव – महासंवाद
- Advertisement -

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या १२ स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव – महासंवाद

नवी दिल्ली दि. 17 : प्रजासत्ताकदिनाच्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील दोन असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत.

राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे शिबिरार्थीं योग, कवायत, परेड संचलन सराव, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात साजरे होणाऱ्या विविध सणांचे  सादरीकरण केले. याअंतर्गत ‘मकर संक्रातीचे महाराष्ट्रातील महत्व’ या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. याबरोबर 10 ते 12 जानेवारी  रोजी सर्व शिबिरार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त भारत मंडपम प्रगती मैदान येथे सहभागी झाले होते.

हे शिबीर 31 जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून एनएसएसच्या स्वयंसेवकांसह आलेले डॉ बी. एन. पुरंदरे (कला), श्रीमती एस. जी. गुप्ता (वाणिज्य) व श्रीमती एस. ए. मिठाईवाला (विज्ञान महाविद्यालय), लोणावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे यांनी दिली.

महाराष्ट्रातील विद्यार्थी – विद्यार्थिनींचा असणार समावेश

महाराष्ट्रातून ‘एनएसएस’चे बारा विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यातील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी हे मुख्य पथसंचलनात असणार आहेत. एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक हे राज्यातील विविध कॉलेजमधून आहेत. सिटी प्रीमियर कॉलेजचा तेजस सोनसरे, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कॉलेजचा हरीओम इंगळे, नाशिक जिल्ह्यातील ( निफाड, लासलगाव ) एन व्ही पी  मंडल्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचा स्वरूप ठाकरे, वर्धा जिल्ह्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा गुरु प्रसाद सतोने, मुंबई येथील के सी कॉलेजचा, आदित्य चंदोला, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला राहुल धर्मराज, केटीएचएम कॉलेज नाशिक येथील कविता शेवरे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील वेदिका राजेमाने, हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास महिला विज्ञान महाविद्यालय पुणे येथील पूजा बोंडगे, महात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क तलोडा येथील सुनिता उंद्या, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील अभिज्ञा  मानुरकर, श्री आर एल टी कॉलेज ऑफ सायन्स, अकोला येथील लीना आठवले हे विद्यार्थी एनएसएसच्या शिबिरात सराव करीत आहेत.

गोवा राज्यातून दोन स्वयंसेवकांचा समावेश असून विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स एज्युकेशन कम्प्युटर अँड मॅनेजमेंट, पर्वरी येथील फाल्गून प्रीयोळकर आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स खंडोला येथील अक्षता कलासगौदरचा समावेश आहे.

या शिबिरासाठी भारतातून 200 स्वयंसेवक सहभागी झाले असून यामधून 148 स्वयंसेवक कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत.

- Advertisement -