मुंबई, दि, 30 : महाराष्ट्र राज्याला संघर्षशाली इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे आणि आजही तो सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे पाहिलेले स्वप्न अद्याप अपूर्ण आहे, मात्र सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला संघर्षमय लढा असाच सुरुच राहील. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र राज्य हे स्वप्न आणि उदिष्टय साध्य करील, असा विश्वास व्यक्त करीत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्यातील तमाम 1 मे च्या निमित्ताने जनतेला महाराष्ट्र दिन आणि सर्व कामगार बंधु-भगिनींना कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे स्मरण करून ॲड. यशोमती ठाकूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपले महाराष्ट्र राज्य हे भारतीय संविधानासोबतच शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी आणि राष्ट्र संतांच्या प्रेरणेने महाविकासाच्या दिशेने देशात अग्रेसर आहे आणि यापुढेही रहाणार, या विकासात राज्यातील जनतेसोबतच कामगारांचा मोठा वाटा आहे. यासाठी राज्यातील जनतेच्या सोबतीने आणि विश्वासाने आम्ही प्रगतीची उंचचउंच शिखरे पार करून महाराष्ट्राचा झेंडा सतत फडकवत ठेवू. म्हणूनच मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
जय महाराष्ट्र ! जय कामगार !