Home शहरे नागपूर महाराष्ट्र निवडणूक 2019: ”शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा”

महाराष्ट्र निवडणूक 2019: ”शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा”

0

तिवसा (अमरावती) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. प्रदेश काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे वृत्त येत असताना ठाकूर यांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. परतीच्या पावसाने तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करत असताना रविवारी त्यांनी यावली येथील एका शेतातून फेसबुक लाईव्ह केले. शिवसेनेच्या सत्तेच्या समसमान वाटपाच्या आग्रहामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाताना दिसत नाही. मात्र, भाजपा-शिवसेनेतील तणावामुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा ‘पुलोद’सारखा राजकीय प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे शरद पवारांसह अन्य दोन नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकूर यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकार आमचे का तुमचे, या वादात गुंतलेल्या भाजपने शेतक-यांकडे लक्ष द्यावे, धमकी, कुवत, गुर्मी अशी टीका टिप्पणी बंद करा, इतकी गुर्मी कामाची नाही. सरळ शरद पवार यांना मुख्यमंत्री बनवा. काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, अशी मागणीही त्यांनी केली.