Home ताज्या बातम्या महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सव २०२२ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयाेजन

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सव २०२२ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयाेजन

0
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सव २०२२ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयाेजन

मुंबई, 2 सप्टेंबर 2022: गणेशोत्सवात महाराष्ट्राचा उत्साह पाहण्यासारखा असतो विशेषतः मुंबई आणि पुण्यात अत्यंत देखणा सोहळा आयोजित केला जातो. या शहरांमधील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. हे दृश्य भारतातील व परदेशातील पर्यटकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचं नियोजन

पर्यटन संचालनालय (DoT) नोंदणीकृत पर्यटकांना मार्गदर्शकांच्या सहाय्याने मुंबई आणि पुणे येथील निवडक प्रसिद्ध गणेश मंडळाच्या दर्शनाची संधी देत आहे.  मुंबई येथे पर्यटक/भक्तांना फोर्ट चा राजा, गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ गणपती, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा आणि जी.एस.बी सार्वजनिक गणेशोत्सव समिती, वडाळा ही ठिकाणे या टूर अंतर्गत समाविष्ट असतील.

पुणे येथील गटाला कसबा पेठेतील कसबा गणपती, नारायण पेठ येथील केसरी वाडा गणपती, गुरुजी तालीम गणपती, बुधवारपेठ येथील तांबडी जोगेश्वरी गणपती, तुळशीबाग गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी दर्शनासाठी नेले जाईल.

गणपती दर्शन सहलीची वेळ व किंमत:

मुंबई: भारतातील पर्यटकांसाठी 850/- आणि परदेशी पर्यटकांसाठी 1600/- (प्रति व्यक्ती)

वेळ: सकाळी ९ ते दुपारी  २

पुणे: भारतातील पर्यटकांसाठी 350/- आणि परदेशी पर्यटकांसाठी 550/-  (प्रति व्यक्ती)

वेळ:  सकाळी 9 ते दुपारी 12.

पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी सांगितले की, ह्या पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून आमच्या टूर बद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आहे. आणि त्यांना मुंबई आणि पुणे येथील गणपती मंडळांना भेट देण्याचा अनुभव घेण्याचे आवाहन करायचे आहे. आम्ही प्रमाणित टूर मार्गदर्शकांची सोय केली आहे जेणेकरून त्यांना मंडळ बद्दलची सर्व माहिती सामायिक करून शक्य तितका सर्वोत्तम अनुभव प्राप्त होईल.”

मुंबई टूर साठी, https://in.bookmyshow.com/activities/mumbai-ganapati-pandal-hopping-tours/ET00338043  ला भेट द्या

पुणे टूर साठी, https://in.bookmyshow.com/activities/pune-ganapati-pandal-hopping-tours/ET00338071  ला भेट द्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गणेश मंडळांचे दर्शन

महाराष्ट्र पर्यटन विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांसोबत महाराष्ट्रातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सहलींचे आयोजन केले आहे. हा दौरा कालपासून सुरू झाला आणि २, ५, ६ आणि ७ सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमांतर्गत पर्यटकांना मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील विविध प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये नेले जात आहे.

मुंबई मध्ये अंधेरी, कुर्ला आणि चेंबूर या तीन वेगवेगळ्या पिकअप पॉइंट्सवरून टूर सुरू होतील. मुंबई चा पेशवे (विलेपार्ले), खेरनगरचा राजा (वांद्रे), सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी), गणेश गल्ली (लालबाग), जीएसबी गणपती (वडाळा), टिळक नगर येथील सह्याद्री मित्र मंडळ गणपती आणि चेंबूर चा राजा (सिंधी सोसायटी) या मंडळांचा समावेश आहे.

ठाणे येथील शिव समर्थ मित्र मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ, जनजागृती मित्र मंडळ, सूर्योदय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव आणि पानशिल सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन पर्यटक करणार आहेत.

पुणे येथील पर्यटक तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री कसबा गणपती आणि केसरी वाडा गणपतीच्या प्रसिद्ध मंडळांना भेट देतील.

नागपुर मध्ये पर्यटकांना टेकडी गणपती, आडासा गणेश मंदिर, अष्टदशभुज गणेश मंदिर, रामटेक आणि रेशमबाग गणपती येथे नेण्यात येणार आहे.

टूरची वेळ खाली नमूद केली आहे:

  • मुंबई: सकाळी ९.०० ते संध्याकाळी १.०० वा
  • ठाणे: दुपारी ३:०० ते ६:०० वा
  • पुणे: सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०
  • नागपूर: सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वा

एकूण १६०० ज्येष्ठ नागरिकांनी या दौऱ्यासाठी ४ शहरांमध्ये नोंदणी केली आहे.

मा. पर्यटन मंत्री, मंगल प्रभात लोढा म्हणाले, “आम्ही आमच्या सर्व टूर सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक, पोलीस, इतर सरकारी विभागांशी समन्वय साधला आहे. खास लक्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सोयी- सुविधात देण्यात येत आहे. गणेशोत्सवादरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मला आनंद आहे की ते या अनुभवाचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड कौतुक मिळत आहे.”

पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया करमरकर दातार यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीसाठी मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत आणि सर्व बसेस पूर्ण क्षमतेने भरून जात आहेत. ५, ६ आणि ७ सप्टेम्बर साठी सुद्धा प्रीबूकिंग झाली आहे म्हणून यापुढे आम्ही कोणतीही ऑनलाइन नोंदणी स्वीकारणार नाही.”

ज्येष्ठ नागरिक इतर तीन टूरसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय मीडिया, पर्यटन प्रभावक (ट्रॅव्हल इन्फ़्लुएन्झर) आणि ट्रॅव्हल एजंटसाठी फॅम टूर

8 आणि 9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय प्रसारमाध्यमे, प्रवासी प्रभावकार आणि टूर ऑपरेटर यांच्यासाठी मुंबई आणि पुण्यातील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळांचे दर्शन आणि गणेश विसर्जनाचे अनुभव देण्यासाठी फॅम टूर आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईसाठी एकूण 32 सहभागी आणि पुणे साठी एकूण 30 सहभागी आहेत.

मुंबई आणि पुणे येथे सहभागी होणारे मेडिया, इन्फ़्लुएन्झर्स व ट्रॅव्हल एजंट्स गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बेंगळुरू, तामिळनाडू, दिल्ली इत्यादी राज्यातुन येत आहेत. त्यांना दोन्ही शहरातील लोकप्रिय गणेश मंडळांना भेट देता येईल. या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतातील पर्यटकांपर्यंत गणेशोत्सवाचे प्रसार करणे असे आहे. त्यांना दोन्ही शहरांच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी सुद्धा संधी मिळेल.”

सोशल मीडियावर राबवण्यात येणारे उपक्रम

सेलिब्रिटी गणपती मोहिमेत, जॅकी श्रॉफ, अभिजीत खांडकेकर, अभिजीत सावंत, मेघा धाडे, जय धुडाणे, करण वाही आणि इतर अनेकांनी या उत्सवादरम्यान पर्यावरण पूरक गणपतीचे घरोघरी स्वागत करण्याचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाशी सहकार्य केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींचे प्रदर्शन सुद्धा ते करत आहेत. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता सण साजरा करण्याचा संदेश ते त्यांच्या सोशल मीडिया हंड्ल्स वर शेअर करत आहेत. या सोशल मीडिया मोहिमेसाठी #GoEcoWithBappa असा हॅशटॅग वापरलेला आहे.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर ढोल ताशा पासून विसर्जन पर्यंत गणेशोत्सवातील सर्व पैलू आम्ही कव्हर करत आहोत.

आमच्या सोशल मीडिया- इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यु ट्यूब वर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आपली संस्कृती, सण आणि परंपरा जगभर पसरवण्याबरोबरच निसर्गाशी मैत्री करण्याचा आणि तिला कोणतीही हानी न पोहोचवण्याचा संदेश देण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आमचे सोशल मीडिया हँडल वापरत आहोत. अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

विदेशी पर्यटक आणि सेलिब्रिटींसाठी मूर्ती विसर्जन अनुभव

गिरगाव येथे विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर एकत्र येतात. हे दृश्य बघण्यासारखे असते.

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले कि गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळ्याचे जवळून दर्शन घेणार्‍या परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विभागाने वातानुकूलित मंडप उभारला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वा. पासून आयोजित आहे. परदेशी पर्यटकांना फेटा बांधून आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे. व्ह्यूइंग डेकमुळे पर्यटक विसर्जनाच्या अनुभवाने मंत्रमुग्ध होतील. याव्यतिरिक्त, आम्ही जवळपासच्या 4 आणि 5 तारांकित हॉटेलांशी संपर्क साधत आहोत आणि त्यांना आमच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यास सांगत आहोत जेणेकरून तेथे राहणाऱ्या परदेशी लोकांनाही असाच अनुभव मिळू शकेल. आता पर्यंत थायलंड मधील 65 पर्यटकांनी या अनुभवासाठी नोंदणी केली आहे.

कौन्सुलेट जनरल साठी टूर

आज महाराष्ट्र पर्यटन महामंडलाने (MTDC) विविध देशांच्या कौन्सुलेट जनरल यांना मुंबई येथील प्रतिष्ठित मंडळांच्या भेटीची सोय केली होती. मुंबईच्या जीएसबी, गणेश गल्ली, लालबागचा राजा आणि केशवजी नाईक गणपती मंडळांना भेट दिली जात आहे. ७ सप्टेंबर रोजी सुद्धा असाच दौरा इतर देशांसाठी केला जाईल.

 

०००