Home शहरे जळगाव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: ‘एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांच्यातल्या रस्सीखेचीत जळगावचा जीव गेलाय’

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: ‘एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांच्यातल्या रस्सीखेचीत जळगावचा जीव गेलाय’

0

महाराष्ट्राच्या निवडणुकीत खानदेशाला एक वेगळं महत्त्व आहे. गेल्या पाच वर्षांत जळगावनं महाराष्ट्राला दोन मे मंत्री दिले.

2014ला एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्याच्या खांद्याला खांदा लावून भाजपची सत्ता आणली तर गेली पाच वर्षं गिरीश महाजन राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ट्रबलशूटर’ म्हणून ओळखले जातायत.

जळगावनं राज्याला इतके मोठे नेते दिले असतील तर मग जळगावचा विकास खऱ्या अर्थानं झालाय का ?

राज्यात निवडणुकीचं वातावरण जरी चांगलंच तापलं असलं, तरी उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाला मात्र पावसानं थंड केलंय.सकाळी जाग आली तीही मुसळधार पावसामुळं.

गेल्या पाच वर्षांत जळगावनं राज्याचं राजकारण अगदी जवळून पाहिलंय आणि खरं तर बदललंयसुद्धा. अगोदर एकनाथ खडसे आणि आता गिरीश महाजन हे जळगावला लाभलेले दोन हेव्हीवेट मंत्री. पण या दोघांच्या वादात जळगावचा बळी चाललाय अशीच काहीशी प्रतिक्रिया जळगावकरांकडून ऐकायला मिळाली.

दिवसाची सुरुवात झाली ती चहाच्या टपरीवर जळगावमधल्या पत्रकारांशी गप्पा मारत. खडसे आणि महाजनांच्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या कामाविषयी बोलूनच आमच्या गप्पांची सुरुवात झाली.

तरुण भारतच्या जळगाव एडिशनचे संपादक विशाल चड्डा यांच्या मते, जळगावमध्ये आजच्या घडीला राजकीय दूरदृष्टी असलेला नेता नाही. गेली 20 वर्षं खडसेंनी एक प्रकारचं राजकारण केलं, महाजनांची स्टाईल वेगळी. पण यातून जळगावला पाहिलं गेलं तर काहीच मिळालं नाही.

लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या मते, खडसे आणि महाजन यांच्या वर्चस्वाच्या लढाईत जळगाव भरडलं जातंय. तापी खोरे महामंडळाचा प्रश्न असो, कापसासाठी वाढीव हमीभाव असो किंवा केळीसाठी नवीन योजना, खडसे आणि महाजन या दोन नेत्यांच्या राजकीय वादात त्या फक्त कागदावरच उरल्यात.

“गेल्या पाच वर्षांत आपण पाहिलं तर जळगावला तब्बल चार पालकमंत्री मिळालेत. निवडणुकीच्या तोंडावर आता परत गिरीश महाजनांकडे जळगावचं पालकमंत्रिपद आलंय. पण सततच्या या बदलांमुळे जळगावच्या नागरिकांच्या मनातही शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासाची आश्वासनं तर दिली, पण गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याचं पालकत्व करणारा एक पालकमंत्रीही दिला नाही ही खंतही त्यांच्या मनात आहे,” असं मिलिंद कुलकर्णी सांगतात.

दैनिक लोकशाहीचे संपादक राजेश यावलकरांच्या मते, “जळगावचे दोन मोठे नेते म्हणून खडसे आणि महाजन ओळखले तर जातात. पण खऱ्या अर्थानं त्यांनी कधी संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंच नाही. आपापल्या मतदारसंघासाचा विकास करण्यात ते इतके रमले की जळगावला त्याचा फटका सोसावा लागतोय.

याच विषयावर आज जळगावच्या तरुणाईलाही आम्ही बोलतं केलं. ‘राजकारणात मग्न असलेल्या लोकांना सर्वसामान्य जनतेची काय फिकीर,’ असं एकानं म्हटलं. जळगावकडे सर्व मुख्य नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा जाणीव त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

आम्हाला शिक्षणाच्या आणि त्याचबरोबर रोजगाराच्या योग्य आणि समान संधी हव्यात हीच, त्यांची माफक अपेक्षा होती. जर आम्हाला उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या योग्य संधी आमच्याच जिल्ह्यात मिळाल्या तर आम्ही बाहेर का जाऊ? आणि हे थांबवण्यासाठी आमचे नेते काय करतायत? हाच प्रश्न त्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींना विचारायचा होता.

निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फक्त आश्वासनं मिळतात, पण एकदा का निवडणूक संपली की आमच्याकडे साधं कोणी ढुंकूनही पाहत नाही, ही खंतही व्यक्त करायला ते विसरले नाहीत.

काही सरकारच्या आश्वासनांवर नाराज आहेत, काही नेत्यांच्या अनास्थेवर तर काहीजण इतके नाखूश आहेत की आपण नोटाचाच पर्याय वापरणार असल्यावर अगदी ठाम आहेत. कविता राणे त्यापैकीच एक.

आज नोकऱ्या नाहीत, जळगावपर्यंत येणारे रस्ते नीट नाहीत. रस्त्यांवर खड्ड्यांचं जाळं आहे, आमच्या घरच्यांचे जीव घेणाऱ्या या मृत्यूच्या सापळ्याकडे तर कोणी बघतंच नाही. गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, पण तरीही आमच्या घशाला कोरड का पडते?”

कविताचा राग आणि तीचं बोलणं बोचरं होतं.

पण तरुणांच्या मनाला भिडणारं… राज्यात एक काय, दोन काय, कितीही नेते असोत जळगावला सगळ्यांनी वाऱ्यावरच सोडलंय.

“खडसे आणि महाजनांच्या रस्सीखेचीत जळगावचा जीव गेलाय” इतक्या थेट शब्दांत तिनं आपल्या भावना मांडल्या. लोकांना पटो वा न पटो, पण आज अशाच व्होकल असणाऱ्या तरुणांची जळगावला आणि महाराष्ट्राला गरज आहे.

पण आजची परिस्थिती पाहिली तर जळगावमध्ये पूर्णपणे भाजपचं वर्चस्व असलेलं बघायला मिळतं. जिल्ह्यात एकूण 11 जागा आहेत आणि त्यातील सहा जागांवर भाजपचं तर तीन जागांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यामुळे युती झाली काय की नाही झाली काय, जळगावचा गड भाजप राखणार यात शंका नाही, असं पत्रकार शेखर पाटील सांगतात.

त्यामुळे येत्या निवडणुकीत महाराष्ट्र कुणाचा, हे सांगणं सध्या जरी कठीण असलं तरी नाशिकप्रमाणेच जळगावचा निकाल निकालही भाजप आणि युतीच्या पारड्यात पडण्याचीच शक्यता जाणकार वर्तवतायत.