Home ताज्या बातम्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी – सचिव अपूर्व चंद्रा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी – सचिव अपूर्व चंद्रा

0
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी – सचिव अपूर्व चंद्रा

नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र शासनाच्या  सांस्कृतिक कार्य  संचालनालयाच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफिती, जिंगल्स, बॅनर आदी प्रचार साहित्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी कौतुक केले आहे.

श्री. चंद्रा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिलेल्या संदेशात राज्य शासनाच्या ‘घरोघरी  तिरंगा अभियाना’ त जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करुन या अभियानास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रचार साहित्याचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय  ‘हर घर तिरंगा अभियान’ देशभर राबवित आहे. महाराष्ट्रातही हे अभियान राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ नावाने राबविण्यात येत आहे.

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या प्रचार व जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने   www.mahaamrut.org  हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावरुन जिंगल्स, कलाकारांद्वारे  आवाहन करणारे संदेश, ध्वनिचित्रफिती, विशेष गाणी, बॅनर आदी साहित्य उपलब्ध करू देण्यात आले आहे. राज्य शासनाचे विविध विभाग व नागरिक या संकेतस्थळाहून उपलब्ध साहित्य सहज डाऊनलोड करून वापरू शकतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली ही सोय अभिनव असून याने राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियाना’विषयी जनजागृती निर्माण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे श्री. चंद्रा यांनी यावेळी सांगितले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.