Home Latest News महाराष्ट्र सदन येथे उद्या हातमाग वारशावर आधारित ‘फॅशन शो’ – महासंवाद

महाराष्ट्र सदन येथे उद्या हातमाग वारशावर आधारित ‘फॅशन शो’ – महासंवाद

महाराष्ट्र सदन येथे उद्या हातमाग वारशावर आधारित ‘फॅशन शो’ – महासंवाद

महाराष्ट्र सदन येथे उद्या हातमाग वारशावर आधारित ‘फॅशन शो’ – महासंवाद

नवी दिल्ली, दि. २०: महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणाऱ्या फॅशन शोचे आयोजन उद्या २१ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आले आहे.

येथे सुरू असलेल्या चार दिवसीय हातमाग साडी प्रदर्शनाअंतर्गत हा शो होईल. विकास आयुक्त (हातमाग) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिखाज् कारागिरी‘ च्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले आहे.

या फॅशन शोमध्ये तीन मुख्य सादरीकरण होणार आहेत. सुरुवातीला ‘ट्रायबल टू मॉडर्न आर्ट –एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत पिचवाई, पट्टचित्र, वारली, गोंड यांसारख्या भारतीय कलाशैलींनी प्रेरित हस्तचित्रांकित हातमाग साड्यांचे प्रदर्शन होईल.

त्यानंतर ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि महिला अधिकारी महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान रॅम्पवरून सादर करतील.

तिसऱ्या सादरीकरणात ‘फ्रॉम द विव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ अंतर्गत महाराष्ट्रातील विविध भागांच्या पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी यांसारख्या साड्यांचे सादरीकरण करतील. शेवटी प्रदर्शनातील स्टॉल्समधील विणकर प्रतिनिधींना रॅम्पवर आमंत्रित केले जाणार आहे.

‘शिखाज् कारागिरी’ ब्रँडच्या हस्तचित्रांकित संग्रहाचे हे विशेष सादरीकरण असून, संकल्पना प्रसिद्ध कलाकार शिखा अजमेरा यांची आहे आणि दिग्दर्शन सेलिब्रिटी फॅशन डिझायनर संदेश नवलखा करत आहेत.

या कार्यक्रमातून विणकर, कारागीर आणि पारंपरिक वस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दिल्लीतील साडीप्रेमी आणि महाराष्ट्र प्रेमींनी या अनोख्या फॅशन शोला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले आहे.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

error: Content is protected !!
WhatsApp chat