
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे कृषीमाल, फळे आणि फुलांचे केंद्र असून, येथून विविध उच्च दर्जाची शेतीउत्पादने सायप्रससारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास उत्तम संधी आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सायप्रससोबत कृषीमाल निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक आहे, असे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, इंडियन मर्चंट्स चेंबर आणि सायप्रसचे मानद वाणिज्यदूत विराज कुलकर्णी यांच्यासोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे, सायप्रसचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, सायप्रस ही मध्य पूर्वेतील एक लहान परंतु महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्च उत्पन्नावर आधारित आहे. अलीकडील काळात येथे दर्जेदार कृषी उत्पादने आणि प्रक्रिया अन्नपदार्थांची मागणी झपाट्याने वाढत असल्याने सायप्रससोबत व्यावसायिक संबंध वृद्धिंगत केल्यास नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला. येत्या काळात महाराष्ट्रात व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सायप्रसला निमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ