Home बातम्या ऐतिहासिक महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ

0
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ

औरंगाबाद, दि.15 (विमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ आज रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

            विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे उपायुक्त सु.द.सैदाणे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे हिनेन गांधी, श्री.भोगे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता माहिती केंद्र औरंगाबादचे सहायक आयुक्त सुरेश वराडे तसेच संबंधित इतर अधिकारी व मान्यवर यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे स्वातंत्र्य दिनी या यात्रेचा शुभारंभ करण्यात येत आहे. दि.15 ऑगस्ट, ते 02 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मार्गदर्शन त्यासोबतच निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. त्यासेाबतच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यावर या यात्रेच्या माध्यमातनू भर देण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व जनतेपर्यंत या यात्रेचा उद्देश पोहचविण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान राबविण्यात येणार असून प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत्‍ जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र, राज्यस्तरीय सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा असे या यात्रेचे प्रमुख टप्पे राहणार आहे.

सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही अट नाही. कृषी, शिक्षण, आरोग्य शाश्वत विकास, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा, इत्यादी क्षेत्रातील नवसंकल्पना असणे आवश्यक आहे. या यात्रेच्या ठिकाणी सहभागधारकास सहभाग घेण्यासाठी आपली नोंदणी करता येईल तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेच्या पोर्टलवर आणि सादरीकरणाच्या ठिकाणीही नोंदणी करता येईल.

सदर यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात दि.23 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर, 2022 या दरम्यान विविध तालुक्यात भेट देणार आहे.  दिनांक 26 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मॅजिक इंक्युबॅशन सेंटर आणि डॉ.बा.आं. मराठवाडा विद्यापीठ    या ठिकाणी भेट देणार आहे, दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी फुलंब्री येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजर्षी शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी तालुका फुलंब्री  या ठिकाणी भेट देणार आहे, तसेच सिल्लोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामकृष्ण महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी आणि वैजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विनायकराव पाटील महाविद्यालय,आनंद आयुर्वेदिक महाविद्यालय व जेके जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैजापूर या ठिकाणी भेट देणार आहे. दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी सोयगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव व नॅशनल कॉलेज पळसखेडा तालुका सोयगाव येथे भेट देणार आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी पैठण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रतिष्ठान महाविद्यालय, मानसिंग भाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालय ढोरकीन तालुका पैठण व नात अध्यापक महाविद्यालय पैठण येथे भेट देणार आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी सदर यात्रा गंगापूर व खुलताबाद येथे भेट देणार आहे. गंगापूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुक्तानंद महाविद्यालय, तहसील कार्यालय व महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल गंगापूर येथे भेट देणार आहे तर खुलताबाद  येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम के एज्युकेशन कॅम्पस खुलताबाद व कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथे भेट देणार आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी सदर यात्रा कन्नड येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कन्नड, रामराव पाटील एम सी व्ही सी कॉलेज व संजय गांधी विज्ञान महाविद्यालय कन्नड येथे भेट देणार आहे

या यात्रे अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांमधून अव्वल तीन विजेते घोषित केले जाणार असून सर्वोत्तम दहा (अव्वल तीन पकडून) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

पारितोषिकांचे स्वरुप

जिल्हास्तरावरील 3 विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार, 15 हजार व 10 हजार तर विभागस्तरावर 6 जनउद्योजक व 6 महिला उद्योजिका यांना प्रत्येकी 1 लाख रुपये तसेच राज्यस्तरीय 14 विजेत्यांना त्यापैकी 7 महिलांना प्रथम विजेत्याला 1 लाख तर द्वितीय विजेत्याला 75 हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.