महावितरणने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वीज पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार करावा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

महावितरणने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वीज पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार करावा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
- Advertisement -


मुंबई, दि. ९ : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल, खान्देश्वर, कामोठे, कळंबोली आणि खारघर या शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्राहकांची संख्या विचारात घेऊन महावितरणने आराखडा तयार करून सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिले.

नरिमन पॉईंट येथील निर्मलभवन मधील एमएसआरडीसी कार्यालयात पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहर भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर, भांडुप क्षेत्राचे मुख्य अभियंता संजय पाटील, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, पनवेल शहरचे कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, नगरसेवक, सरपंच आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करून तातडीने सर्व कामे पूर्ण करावीत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महावितरणच्या उपकेंद्रामध्ये ज्या कंत्राटांदारानी कामे व्यवस्थित केली नाहीत अशा कंत्राटदारांना काळया यादीत टाकावे. कामोठे येथील सेक्टर २५ येथे उपकेंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी अतिरिक्त आराखडा तयार करण्यात यावा.

कामोठे परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करावा. तसेच उर्वरित ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम तत्काळ पूर्ण करावे. कळंबोली शहरात सद्यस्थितीला तीन किलोमीटर एवढ्या लांबीची  प्राप्त झालेल्या केबलचे काम सुरू करावे; तसेच धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करावा, अशा सूचना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

००००

गजानन पाटील/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -