मुंबई, दि. 9 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम उत्साहात साजरे होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत 09 ऑगस्ट रोजी भारतीय विद्या भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर वारसा पदयात्रा म्हणजेच प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रभातफेरीत 500 पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा प्रसार, देशाबद्दल आत्मीयतेची भावना आणि राष्ट्रजागृती निर्माण व्हावी, या हेतूने या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभात फेरीचा प्रारंभ भारतीय विद्या भवन, चर्नी रोड येथून सकाळी 9:00 वाजता सुरु होऊन ऐतिहासिक ठिकाण ऑगस्ट क्रांती मैदान येथे संपन्न होईल. प्रभातफेरी दरम्यान दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 दरम्यान राज्यभर आयोजित होणारा घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी घोषणा देण्यात येतील. या प्रभात फेरीला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रभात फेरी संपन्न झाल्यावर भारतीय विद्या भवन सभागृह येथे एक सूर एक ताल हा कार्यक्रम सकाळी 10.10 वाजता आयोजित होईल. यानंतर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाचे प्रदर्शन करणारा पुण्यतीर्थ बॅले हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.
00000