Home ताज्या बातम्या महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वराच्या दर्शनासाठी औंढ्यात भाविकांच्या रांगा

महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वराच्या दर्शनासाठी औंढ्यात भाविकांच्या रांगा

0

औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील नागनाथाच्या दर्शनासाठी येथे भक्तांचा जनसागर उसळला आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी रात्री व सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यभर आणि दिल्ली ,कर्नाटक ,तेलंगणा ,हरियाणा, पंजाब, गुजरात ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. 

हर हरमहादेव, नागनाथ महाराज की जय अशा जयघोषात भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त नागनाथाचे दर्शन घेतले. प्रभू नागनाथाची महापूजा करण्यात आली मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खासदार हेमंत पाटील,  आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहसचिव विद्या पवार, आनंद नीलावर यांच्या हस्ते करण्यात आली. भक्तांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या  आहेत तसेच  विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा नागनाथ संस्थांनच्यावतीने अपंग दिव्यांग व्यक्तींना थेट दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिले आहे. शिवाय भाविकांना दर्शन रांगेमध्येच  पाणी, चहा व फराळाची व्यवस्था केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. येथील दर्शन व्यवस्था अतिशय कठीण असल्याने एका भाविकाला दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गर्भगृह लहान असल्याने गर्दीच्या वेळी ही समस्या उद्भवत असते. परंतु या काळात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर संस्थांनच्यावतीने अभिषेक पूजा व इतर पूजा बंद करण्यात आल्या आहेत. भाविकांना दर्शनाची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून विश्वस्त मुंजाभाऊ मगर, देविदास कदम, गजानन वाखरकर, पंजाबराव गव्हाणकर, डॉ. विलास खरात, गणेश देशमुख आदी प्रयत्न करत आहेत. यासह मंदिर परिसरात ४०० पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बालाजी काळे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची उपस्थिती आहे. 

रात्री निघणार नागनाथांची पालखी 
रात्री सात वाजेच्या सुमारास श्री नागनाथाची पालखी मिरवणूक रावलेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. रावलेश्वर हे प्रभू नागनाथाचे मामा असल्याने त्यांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी स्वतः महादेव यांची भेट घेऊन शिवपार्वती विवाह सोहळा येण्याचे आमंत्रण देतात अशी आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने ही पालखी मिरवणूक परंपरेनुसार  काढल्या जात असल्याची माहिती संस्थांनचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांनी दिली.