महिलांना स्वयंरोजगार देणारा कल्याणचा उद्योजिका महिला बचत गट-मृणाल दुर्वे

- Advertisement -

दिवाळी फराळ महिला व्यापारी पेठेस भरभरुन प्रतिसाद

ठाणे : महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करुन कल्याणच्या उद्योजिका महिला बचत गटाने महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका व सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाल दुर्वे यांनी केले आहे.

कल्याणच्या उद्योजिका महिला बचत गटाने दिवाळी निमित्त `दिवाळी फराळ महिला व्यापारी पेठेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन मृणाल दुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यासमयी मुंबई उच्च न्यायालयात वकील अॅड. मीनल श्रृंगारपुरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उद्योजिका महिला बचत गटाने संपूर्ण महाराष्ट्रात महिला बचत गटाचे जाळे निर्माण करावे व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा असे आवाहन अॅड. मीनल श्रृंगारपुरे यांनी केले. व्यापारी पेठेस कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देवून या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. यासमयी बचत गटाच्या शैला पाटणकर व दिपाली गुप्ते यांनी प्रास्ताविक केले तर सीकेपी संस्थेचे चिटणीस मेघन गुप्ते यांनी सूत्रसंचालन केले.

कल्याणच्या स्वामीनारायण हॉलमध्ये रविवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी एक दिवसाची महिला व्यापारी पेठ आयोजित करण्यात आली होती. पाऊस असूनही या व्यापारी पेठेस कल्याणकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे रविवार ठाणे, डोंबिवली, कल्याणसह अनेक शहरात विविध व्यापारी पेठा, दिवाळी फराळ प्रदर्शने आयोजित करण्यात आली असतांनाही उद्योजिका महिला बचत गटाच्या व्यापारी पेठेस मिळालेला प्रतिसाद लक्षणिय होता.

या व्यापारी पेठेस दिवाळी पदार्थ व दिवाळीसाठी लागणारी विविध साधन सामुग्री होती. कल्याणच्या यशस्वीतेनंतर लवकरच डोंबिवली व ठाणे येथे अशाच व्यापारी पेठा आयोजित करण्यात येणार असल्याचे उद्योजिका महिला बचत गटाच्या शैला पाटणकर, दिपाली गुप्ते, सुचिता चौबळ, पूजा ताम्हाणे तसेच मेघन गुप्ते, पुरुषोत्तम फडणीस इत्यांदींनी सांगितले.

- Advertisement -