Home ताज्या बातम्या महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

0
महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):-  हिमरु शाल निर्मिती प्रशिक्षणाद्वारे हिमरु शाल निर्मितीच्या कलेस पुनरुज्जीवीत करुन महिलांनी उद्योजक व्हावे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण येथे दिले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे आयोजित हिमरु शाल निर्मितीचे महिलांसाठी प्रशिक्षण ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन पैठण येथे करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी डी.यु. थावरे, प्रकल्प अधिकारी भारती सोसे, पुष्पाताई गव्हाणे, सोमनाथ परदेशी, वैशाली परदेशी, तुषार पाटील, विनोद तुपे, प्रतिभा निमकर तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हिमरु शालचे पुनरुज्जीवन करावे. यशस्वी महिला उद्योजक व्हावे. हिमरु शाल उत्पादनाच्या विक्रीसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे मंजूर आराखड्यात पैठणी व हिमरु शाल विक्रीसाठी  प्रशिक्षित महिलांना गाळे उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन त्यांनी दिले. डी. यु. थावरे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.

०००