अमरावती दि. 29 (विमाका): रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिल्या.
आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपूर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक नरेंद्र येते, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरुकुल फाउंडेशच्या संचालिका निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षणासाठी पदवी प्राप्त युवती व महिलांना संधी देण्यात येणार असुन त्यांची प्रवेशासाठी निवड करीत असतांना पालकांना प्रशिक्षणाबाबतचे नियम, निवासाबाबत असलेली सुरक्षितता, भोजन व आदी बाबींची माहिती देण्यात यावी. दुर्बल घटकातील महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्थिरता प्रदान होईल असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.
अमरावती नागपूर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छुक 5 हजार 465 महिलांनी नोंदणी केली असून 2 हजार 224 महिलांनी ऑन लाईन चाळणी परीक्षा दिली. त्यापैंकी 1 हजार 307 महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार असुन प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी दिली.