Home बातम्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूची ‘बोल्ड’ कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट

महिला क्रिकेटपटूची ‘बोल्ड’ कामगिरी; जनजागृतीसाठी विवस्त्र फोटोशूट

0

लंडन : इंग्लंड संघाची यष्टिरक्षक सारा टेलर ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात चपळ यष्टिरक्षक म्हणून ओळखली जाते. पुरुष क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या स्टम्पिंगला जसा तोड नाही, त्याच वेगानं साराही स्पम्पिंग करते. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ती चर्चेत राहिली आहे. याच स्टम्पिंगमुळे सारा पुन्हा चर्चेत आली आहे, परंतु तिने ही स्टम्पिंग क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर इंस्टाग्रामवर केली आहे. पण, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत अंगावर एकही कपडा दिसत नसल्याने सारा चर्चेचा विषय बनली आहे. 30 वर्षीय सारानं इंस्टाग्रामवर बुधवारी एक फोटो पोस्ट केला, त्यात ती विवस्त्र दिसत आहे. ”असे फोटो शूट करणे हे माझ्या कंफर्ट झोनच्या पलिकडचे आहे. पण, एका चांगल्या उद्देशासाठी मी तसं केलं आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी मी हे फोटोशूट केले आहे. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल तक्रार करायची, परंतु त्यातून मी बाहेर पडले. प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते,” असा संदेश तिनं या फोटोखाली लिहिला आहे. ससेक्स क्रिकेट क्लबच्या या खेळाडूनं 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 19 व्या वर्षी तिने वन डे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा महिला खेळाडू ठरली. मानसिकस्थिती खालावल्यानं तिनं 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.  2017च्या महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाची सारा सदस्य होती. 2017च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने जेतेपदाच्या लढतीत भारतावर विजय मिळवला होता. काही कारणास्तव तिनं महिलांच्या अॅशेस मालिकेतून माघार घेतली.